Pimpri : रोटरीतर्फे गणेशोत्सवात ‘निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’ उपक्रम

एमपीसी न्यूज- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लब एकत्र येऊन यावर्षी देखील गणेशोत्सवात ‘निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’, हा उपक्रम राबविणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी – चिंचवड इंडस्ट्रीयल टाऊन, रोटरी क्लब ऑफ देहूगाव आणि रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी या पाच क्लबनी मिळून या वर्षी हा निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रोटरी क्लबच्या वतीने आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. निर्माल्य संकलनासाठी वाहनव्यवस्था तसेच निर्माल्यापासून खतनिर्मिती करणाऱ्या यंत्राची व्यवस्था सर्व रोटरी क्लबनी मिळून केली आहे.

नागरिकांना नदीबद्दल जिव्हाळा वाढावा, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येतो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्था व लोकसहभागातून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी केला आहे, तब्बल आठ टन निर्माल्य गोळा करून नदीमध्ये जाण्यापासून अडविले गेले, अशी माहिती रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आली.

दहा दिवस गणपतीचे असून हा गणेशोत्सव आनंद, उल्हासित वातावरणात साजरा झाला पाहिजे. त्यासाठी गणपती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा असावा, जीव ओतून केलेल्या सजावटीमध्ये प्लास्टिकचा वापर नसावा. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे घरच्या घरी कंपोस्ट करून घरच्या बागेमध्ये टाका, गणपती शक्यतो नदीमध्ये विसर्जित न करता हौदात अथवा घरच्या घरी विसर्जित करावा कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या जिवंत जलस्रोत यांची परिस्थिती गंभीर आहे, पाणी हळूहळू संपत चाललंय, त्यामुळे आपण संस्कृती जपण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, आदर राखला पाहिजे, असे आग्रही मत रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थिती, ब्राझीलमध्ये जळत असलेले भलं मोठे अमेझॉन जंगल, जमिनीतील घटत चाललेली भूजल पातळी, जैव विविधेतेतील नष्ट होत चाललेले प्राणी पक्षी या सर्वांचा आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो, कदाचित आपली पिढी ही एकमेव आहे जिला आतापर्यंत केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची एकमेव संधी आहे, कारण आपण असेच निसर्गाप्रती वागत राहिलो तर दुरुस्ती करण्याची संधी परत नाही, याकडे संयोजकांनी लक्ष वेधले.

पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि रहिवासी सोसायटी यांचे मार्फत निर्माल्य संकलन करण्याचा प्रयत्न या सर्व क्लबच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी सर्वानी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष बाळासाहेब उ-र्हे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल, रोटरी क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रीयल टाऊनचे अध्यक्ष जसविंदर सोखी, रोटरी क्लब ऑफ देहूगावचे अध्यक्ष दत्तात्रय कारके, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ हारपुडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.