Pimpri : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने स्वच्छतेचा आदर्श घालून दिला -खासदार श्रीरंग बारणे

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हँड वॉश स्टेशन प्रदान

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या वतीने 100 हँड वॉश स्टेशन शाळांना प्रदान करण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा जागर रोटरीने मांडला आहे. या प्रकल्पाचा 32 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने ख-या अर्थाने स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम देखील रोटरी करत आहे, असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे ग्रामीण भागातील शाळांना 100 हात धुण्याचे हँड वॉश स्टेशन देण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या शाळांची रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने निवड केली. या सर्व शाळांना खासदार श्रीरंग बारणे आणि रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष शेखर मेहता यांच्या हस्ते हँड वॉश स्टेशन देण्यात आले.

रविवारी (दि. 10) रावेत येथे झालेल्या हँड वॉश स्टेशन प्रदान कार्यक्रमासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित (2021-22) अध्यक्ष शेखर मेहता, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे अध्यक्ष जिग्नेश अगरवाल, टीआरएफ WINS समितीचे सदस्य रमेश अग्रवाल, जिल्हा प्रांतपाल रवी धोत्रे, महेश कोटबागी, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, सचिव शशिकांत शर्मा, सचिन पारेख, संतोष आगरवाल, मारुती बहिरवाडे आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून 100 हँड वॉश स्टेशन देण्यात येणार असल्याची घोषणा कार्यक्रमात खासदार बारणे यांनी केली. रोटरी क्लब ठरवेल त्या शाळेला हँड वॉश स्टेशन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब ऑफ आकुर्डी आणखी 100 हँड वॉश स्टेशन देणार आहे. त्यात ‘रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ’कडून 50 शाळांची भर घातली जाणार आहे. यामुळे पुढील काही दिवसात आणखी तब्बल 350 हँड वॉश स्टेशनचे वाटप करण्यात येणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम चांगला आहे. रोटरी संपूर्ण देशात चांगले काम करत आहे. शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करत आहे. आपत्तीच्या काळात रोटरीचे काम असते. पिंपरी चिंचवड शहरात देखील रोटरी चांगले काम करत आहे. प्राथमिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची भूमिका रोटरी घेत आहे. अनेक शाळा अशा आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे. त्या शाळांना रोटरी मदत करत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये रोटरी क्लब ऑफ आकुर्डीने महापालिकेच्या माध्यमातून काम करायला हवे.

रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष शेखर मेहता म्हणाले, “हात धुण्याची सवय मुलांना सदृढ आरोग्य आणि साक्षरतेसाठी गरजेची आहे. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे यातील योगदान चांगले आहे. शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याच्या दहा टक्के वाटा रोटरीचा असायला हवा.”

रमेश अगरवाल म्हणाले, “हाताची स्वच्छता न राखल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा मृत्यू होतो. यामुळे देशाचे भविष्य धोक्यात आहे. लहान लहान चांगल्या सवयी लावून घेतल्याने मोठे परिवर्तन होते. हात धुण्याची सवय सदृढ आरोग्याची जननी आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात विद्यार्थीच करतात. नियमितपणे हात धुतल्यास श्वसनाचे विकार कमी होतात. रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.

रवी धोत्रे म्हणाले, “हाताचे महत्व अनन्यसाधारण आहे. रोटरी आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थ्यांनी स्वच्छता बाळगायला हवी.”

जिग्नेश अगरवाल म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ आकुर्डी समाजाच्या विविध क्षेत्रात आपले सक्रिय योगदान देत आहे. शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात आम्ही भरीव काम करत आहोत. अनेक शाळांमध्ये स्वच्छतेच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. पण, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यातूनच हँड वॉश स्टेशन देण्याची संकल्पना समोर आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. भविष्यात अशा प्रकारचे आणखी प्रकल्प राबविण्याचा रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचा मानस आहे.”

सूत्रसंचालन गणेश जामगावकर यांनी केले. पुष्पा पमनानी यांनी आभार मानले.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष शेखर मेहता.
हँड वॉश स्टेशनचे उदघाटन करताना खासदार श्रीरंग बारणे, शेखर मेहता, जिग्नेश अगरवाल आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे सदस्य.
हँड वॉश स्टेशन
हँड वॉश स्टेशन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.