Pimpri : संघर्षपूर्ण विजयासह रोव्हर्स ‘अ’ उपांत्यपूर्व फेरीत 

हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी; रेल्वे पोलिस बॉईज, हॉकी पुणेचा दणदणीत विजय 

एमपीसी न्यूज – यजमान रोव्हर्स अकादमी ‘अ’ संघाने बुधवारी संघर्षपूर्ण विजयासह आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज रेल्वे पोलिस बॉईज आणि हॉकी पुणे संघांनी गोलांचा पाऊस पाडत मोठे विजय मिळविले.
नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत आजच्या दिवशी पावसाने काहिशी विश्रांती घेतली असली, तरी मैदानावर गोलांचा पाऊस पडला. मात्र, रोव्हर्स अकादमीला विजयासाठी संघर्ष करावा लागला. आजच्या दिवसातील अखेरच्या सामन्यात रोव्हर्स अकादमी ‘अ’ संघाने विजय मिळवून आगेकूच कायम राखली.
  • हॉकी लव्हर्सच्या खेळाडूंनी केलेल्या बचावामुळे त्यांना खाते उघडण्यासाठी तिसाव्या मिनिटाची वाट पहावी लागली. अंकित गौडने हा गोल केला. मध्यंतरापर्यंत रोव्हर्स अकादमी संघाने 1-0 अशी आघाडी कायम राखली. उत्तरार्धात करण दुर्गा आणि महंमद सादिक शेख यांनी गोल करून संघाची आघाडी वाढवली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत टिकवली. पण, त्यापूर्वी 55व्या मिनिटाला त्यांना गोल स्विकारावा लागला. यश अंगीरने हा गोल केला.

स्पर्धेत आज आकाश सपकाळ आणि तालिब शेख या दोघांची कामगिरी चमकदार झाली. पहिल्या सामन्यात आकाश सपकाळने नोंदविलेल्या चार गोलच्या जोरावर रेल्वे पोलिस बॉईजने नारायणगाव हॉकी क्‍लब संघाचा 14-3 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तालिब शेखने केलेल्या पाच गोलवच्या जोरावर हॉकी पुणे संगाने पुणे सिटी लाईन बॉईज संघाचा 13-0 असा धुव्वा उडवला.
  • रेल्वे पोलिस बॉईज संघाने पाचव्या मिनिटाला खाते उघडले. साकेत सपकाळने हा गोल केला. त्यानंतर त्यांचा गोलधडाका चालूच राहिला. साकेतने नंतर आणखी दोन गोल केले. आकाश सपकाळचा एक आणि तेजस कारळेच्या दोन गोलमुळे रेल्वे पोलिस बॉईज संघांने मध्यंतराला 6-1 अशी आघाडी मिळविली.
उत्तरार्धात रेल्वे बोलिस बॉईज संघाकडून आकाशने आणखी तीन गोल केले. रोशन मुसळे, अमोल भोसले यांनी प्रत्येकी दोन आणि ओमकार मुसळे यांनी एक गोल करून संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पराभूत संघाकडून निलेश आभाळेने दोन, लियाकत अलीने एक गोल केला.
  • त्यानंतर झालेल्या सामन्यात हॉकी पुणे संघाने पुणे सिटी लाईन बॉईज संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. तालिबच्या तुफानी फॉर्मने त्यांचा गोल धडाका कायम राहिला. अजित शिंदेने तीन, अवनीशने दोन, अबुंग सिंगने एक गोल करून त्याला सुरेख साथ केली. अन्य एका सामन्यात ग्रीन मेडोज संघ न आल्याने विक्रम पिल्ले अकादमी संघाला पुढे चाल देण्यात आली. पिल्ले अकादमी संघाने उप-उपांत्यपूर्व फेरी सहज गाठली.

निकाल :
रेल्वे पोलिस बॉईज 14
 (साकेत सपकाळ 5, 13, 30, आकाश सपकाळ 15, 39, 58, 59, तेजस कारळे 17, 28, ओमकार मुसळे 32, रोशन मुसळे 36, 44, अमोल भोसले 38 आणि 49वे मिनिट) वि.वि. नारायणगांव हॉकी क्‍लब 3 (निलेश आभाळे 14, 53, लियाकत अली 45वे मिनिट) मध्यंतर 5-1.

  • विक्रम पिल्ले अकादमी वि.वि. (पुढे चाल) ग्रीन मेडोज :
    हॉकी पुणे 13
     (अजित शिंदे 11, 38, 54, अवनीश एस. 13, 44, अबुंग सिंग 24, तालिब शेख 29, 35, 37, 38, 58, गुणेंद्र 32, 59वे मिनिट) वि.वि. पुणे सिटी लाईन बॉईज 0 मध्यंतर 9-0

उप-उपांत्यपूर्व फेरी:
रोव्हर्स अकादमी अ 3
 (अंकित गुंडे 30, करण दुर्जा 49, महंमद सादिक शेख 58) वि.वि. हॉकी लव्हर्स 1 (यश अंगिर 55वे मिनिट) मध्यंतर 1-0.

  • गुरुवारचे सामने :
    प्रभाकर अस्पात अकादमी विरुद्ध हॉकी पुणे : दु. 12.30 वा. 
    रेल्वे पोलिस बॉईज विरुद्ध एक्‍सलन्सी अकादमी : दु. 2.00 वा. 
    क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध विक्रम पिल्ले अकादमी : दु. 3..30 वा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.