Pimpri : पिंपरीच्या नवनिर्वाचित आमदारांपासून धोका!; जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरपीआयच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

पोलीस आयुक्तांना दिले निवेदन; पोलीस संरक्षण देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर डब्बु आसवाणी, श्रीचंद आसवाणी, अनिल आसवाणी, विशाल कांबळे यांच्यापासून धोका आहे. त्यांनी जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप आरपीआय (ए)चे शहर अध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी केला आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई त्यांच्याकडे कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी निकाळजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सुरेश निकाळजे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, श्रीचंद आसवाणी, अनिल आसवाणी, विशाल कांबळे यांच्यापासून धोका आहे. आयपीआय हा महायुतीचा घटकपक्ष आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या सूचनांनुसार आरपीआयने पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे काम केले आहे. या प्रचाराचा राग मनात धरून अण्णा बनसोडे आणि त्यांचे साथीदार हे आपणांस जीवे मारण्याचा कट रचत आहेत.’

महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, चिंचवडचे लक्ष्मण जगताप, भोसरीचे महेश लांडगे यांचे आरपीआय पक्षाच्या वतीने काम केले आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे व त्यांच्या समर्थकांना पैसे वाटप करण्यास आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे. याचा बनसोडे आणि अन्य जणांना राग असल्याने निकाळजे आणि त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.