Pimpri : मर्चंट नेव्हीच्या ऑनशिप ट्रेनिंगसाठी तरुणाला घातला चार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – मर्चंट नेव्हीत भरती होण्यासाठी ऑनशिप ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. हे ट्रेनिंग घेण्यासाठी एका एजंटने एका तरुणाकडून 4 लाख 10 हजार रुपये घेतले. मात्र, त्याला कुठल्याही प्रकारचे ट्रेनिंग न देता पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून तरुणाची फसवणूक केली. हा प्रकार मार्च ते जून 2019 या कालावधीत घडला.

दिगंबर नंदकुमार मानकर (वय 20, रा. लोणावळा) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ऋग्वेद संजय अमदाबादे (वय 25, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर याला मर्चंट नेव्हीमध्ये भरती व्हायचे आहे. त्यासाठी तो मेहनत घेत आहे. मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी उमेदवाराने ऑनशिप ट्रेनिंग घेणे बंधनकारक आहे. हे ट्रेनिंग दिगंबर याला घ्यायचे होते. दरम्यान, त्याला एका संस्थेच्या माध्यमातून हे ट्रेनिंग दिले जाते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्याने संस्थेबाबत माहिती घेतली. त्याला माहिती मिळाली नाही.

मात्र, हे प्रशिक्षण देण्यासाठी एक एजंट त्याला भेटला. त्याला पैसे दिल्यास तो संबंधित संस्थेत नेऊन ऑनशिप ट्रेनिंग देतो, असे त्याने दिगंबरला आमिष दाखवले. त्यासाठी दिगंबरकडून त्याने 4 लाख 10 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ऋग्वेद गायब झाला. त्याने दिगंबरला शिपवर ट्रेनिंगसाठी न पाठवता त्याने दिलेल्या पैशांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. याबाबत दिगंबर याने पिंपरी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.