Pimpri: शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यावर 500 रुपये दंडाची होणार कारवाई; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 500 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळला होता. आजपर्यंत शहरातील 65 जणांना कोरोनाची लागण झाली. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरण्याचे 8 एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे क्रमप्राप्त आहे. सर्व नागरिकांनी सक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. शहरातील नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणा-या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. दंडाची आकारणी करण्याचे अधिकार आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, सहाय्यक आरोग्याधिकारी यांना देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.