Pimpri RTO News : संचारबंदीपूर्वी विक्री झालेल्या वाहनांच्या ऑनलाईन नोंदणीला परवानगी

एमपीसी न्यूज – राज्यात संचारबंदी लागू होण्यापूर्वी विक्री झालेल्या मात्र, आरटीओत नोंदणी न होऊ शकलेल्या ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहनांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. याबाबत आरटीओ कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पूरत्या स्वरुपात हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचे आदेश राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्यातील आरटीओ कार्यालयांना दिले आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्य शासनाने 14 एप्रिलपासून 15 मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंमध्ये (आरटीओ) देखील केवळ ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, राज्यात संचारबंदी लागू होण्यापूर्वी अनेक नागरिकांनी वाहने खरेदी केली होती. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेणाऱ्या नागरिकांनी अगोदरच वाहने बुक करून ठेवली होती. या वाहनांचे खरेदी- विक्रीचे व्यवहार झालेले आहेत.

राज्यात 14 तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज बंद झाले. त्यामुळे अशा वाहनांची नोंदणी होऊ शकली नाही. या वाहनांची नोंदणी व्हावी, यासाठी राज्यातील वाहन वितरकांकडून मागणी करण्यात आली होती. यानूसार अटी व शर्थीच्या अधिन राहून ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नोंदणी करण्यास परिवहन आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे.

कोरोनामुळे संचारबंदी लागू असेपर्यंत ही सवलत असणार आहे. वाहन वितरकांना वाहन नोंदणीसाठी संबंधीत आरटीओच्या ई मेलवर अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज, विमा, पत्त्याचा पुरावा सादर करावा लागणार असून चॅसीस पेन्सील प्रिंट , छायाचित्र देखील जोडावे लागणार आहे.

पिंपरी- चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “संचारबंदी लागू होण्याआधी ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहनांची बुकिंग झाली होती. त्या वाहनांची ऑनलाइन पद्धतीने आरटीओ कार्यालयामध्ये नोंदणी करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात अद्याप एकही ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी आलेला नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.