Pimpri: शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख रस्त्यांवरील गर्दी ओसरली; शहर ‘लॉकडाऊन’च्या मार्गावर!

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनावश्यक वस्तुंच्या दुकांनाशिवाय इतर सर्व दुकाने आजपासून बंद केले आहेत. त्यामुळे शहरातील महत्वाचे चौक, प्रमुख रस्त्यांवरील गर्दी ओसरल्याचे दिसून येत आहे. शहरात शुकशुकाट असून शहर ‘लॉकडाऊन’च्या मार्गावर आहे. महापालिकेकडून देखील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकीचे सर्व दुकाने, खासगी कार्यालये 31 मार्च पर्यंत बंद केले आहेत. त्यामुळे गर्दी कमी होऊ लागली आहे. आज विकेंड असताना देखील शहरात शुकशुकाट दिसून येत आहे. गर्दी कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बसस्थानक, रेल्वे यासह गर्दी होणा-या ठिकाणी आज गर्दी दिसून येत नाही. व्यापारी पेठ, चित्रपटगृहे, हॉटेल्स कोरोनाच्या भीतीमुळे बंद करण्यात आले आहेत. भाजीपाला मार्केटमध्येही नागरिक दिसून येत नाहीत. महापालिकेने वाचनालये, अभ्यासिका, क्रीडांगणे, उद्याने, जलतरण तलाव बंद केले आहेत.

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) बसच्या फे-या कमी केल्या आहेत. कामगारांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध भागातून नागरिक वास्तव्याला आहेत. हे नागरिक आपल्या गावी जात आहेत. शहरातील दुकाने बंद असल्याने गर्दी होत नाही. नेहमी गर्दी असलेले चौक, रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

पिंपरी,चिंचवड, आकुर्डी, भोसरी यासहप्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. महापालिकेकडून नागरिकांनी घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. सतर्क केले जात असून गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळण्याचे सांगितले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.