Pimpri : परदेश दौ-यात मश्गुल शिष्टमंडळाने जनतेसमोर अहवाल मांडावा – सचिन साठे

एमपीसी न्यूज – बार्सिलोना परदेश दौऱ्यामधून काय निष्पन्न झाले याचा सविस्तर अहवाल महापौर, विरोधी पक्षनेते, सहभागी गटनेते, आयुक्त व संबंधित अधिका-यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर, आयुक्तांबरोबर विरोधी पक्षनेत्यासह गटनेते देखील सहभागी झाले आहेत. बार्सिलोना येथील चर्चासत्रासाठी महापौर राहुल जाधव, विरोधी पक्षनेते दत्ता साने, पक्षनेते एकनाथ पवार, गटनेते सचिन चिखले, प्रमोद कुटे, सह शहर अभियंता राजन पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांच्यासह दहा प्रतिनिधींचे शिष्टमंडळ गेले आहे. चर्चासत्र पूर्ण होऊन चार दिवस झाले तरी अद्यापही शिष्टमंडळाचे सर्व प्रतिनिधी शहरात आलेले नाहीत. महानगरपालिकेच्या खर्चाने होणारे असले खर्चिक परदेश दौरे म्हणजे नागरिकांच्या पैशावर टाकलेला सामूहिक दरोडाच आहे.

वास्तविक विरोधी पक्षाने व इतर गटनेत्यांनी शहरातील नागरिकांना भेडसावणा-या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठविला पाहिजे. सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर अनावशक खर्चिक प्रकल्पांवर जनतेच्या पैशाची लूटमार करीत असते तेंव्हा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध करुन अशी चुकीची कामे थांबविण्यासाठी सत्ताधा-यांना भाग पाडले पाहिजे, अशी नागरीकांची अपेक्षा असते. परंतू या दौ-यात सत्ताधा-यांबरोबरच विरोधी पक्ष देखील सहभागी झाल्यामुळे विरोधकांबाबत देखील अपेक्षाभंग झाला आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून अवघ्या दीड वर्षांत पदाधिकारी व अधिका-यांनी मनपाच्या खर्चाने देश परदेशात सोळा दौरे करुन ‘पर्यटनाचा आनंद’ उपभोगला. यापैकी एकाही दौ-याचा अहवाल सभागृहात मांडलेला नाही. बार्सिलोना दौ-यातील अहवाल आणि यापुढे मनपाचे लोकप्रतिनिधी व अधिकारी नागरिकांच्या पैशाने देश परदेशात दौ-यावर गेले, तर त्या दौ-याची फलनिष्पत्ती काय झाली याचा सविस्तर अहवाल पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडावा अशीही मागणी सचिन साठे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.