Pimpri : यशवंतराव चव्हाण यांनी कॉंग्रेसचा झेंडा व विचार कधीही सोडले नाहीत – सचिन साठे

एमपीसी न्यूज – अखेरपर्यंत मी काँग्रेसचा शिपाई आहे आणि मागे कुणीही नसले तरी काँग्रेसचा झेंडा आणि विचार कधीही सोडणार नाही’’ हा यशवंतराव चव्हाण यांचा विचार कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंगीकारावा हीच यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या 35 व्या पुण्यतिथीनिमित्त संत तुकारामनगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते.

सचिन साठे यांच्या हस्ते संत तुकारामनगर येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस आणि वल्लभनगर येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, शहर महिला कॉंग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नेते मेहताब इनामदार, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, बाबा बनसोडे, मुनसफ शेख, संदेश बोर्डे, मोहन अडसूळ, कुंदन कसबे, व्ही.एस.कबीर, विठ्ठल कळसे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, महात्मा गांधी यांचे राजकीय नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी आनंदाने स्वीकारले. गांधी विचार आपल्या संस्कृतीशी सुसंगतही आहे, यशवंतराव चव्हाण म्हणत, ‘अहिंसा आणि सत्य हे नुसते दोन शब्द नसून एकाच तत्त्वप्रणालीच्या दोन बाजू आहेत आणि म्हणूनच मी व माझ्या सहकार्‍यांनी गांधीजींचे राजकीय नेतृत्व मान्य केले. तसे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मानवतावाद आणि समाजवाद यांनीही मी प्रभावीत झालो आणि त्यांचा अनुयायी बनलो. या निष्ठेशी आम्ही प्रामाणिक राहिलो’ अशी नोंद यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आत्मचरित्रात केली आहे, असेही साठे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.