Pimpri: दापोडी-निगडी बीआरटीएसचे सेफ्टी ऑडिट; पालिका आयआयटीला देणार 27 लाख रुपये

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी या साडेबारा किलोमीटर बीआरटीएस मार्गावर बससेवा सुरू केली आहे. या मार्गाचे आयआयटी पवईकडून सेफ्टी ऑडिट करुन घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. सेफ्टी ऑडीट करण्यासाठी येणा-या 27 लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू केली आहे. मात्र, यामुळे प्रवाशांच्या जीवीतास धोका असल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेच्या वतीने या मार्गावर ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा पुरवत असतानाच मार्गाचे एका महिन्यात याशिवाय तीन वर्षांत सहा महिन्यांतून एकदा सेफ्टी ऑडिट केले जाणार आहे. पहिल्या ऑडिटचा अहवाल दोन महिन्यांनंतर उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे.

आयआयटी पवई संस्थेने एकूण 39 लाख रुपये खर्च सांगितला होता. मात्र, ही रक्कम अधिक असून, महापालिकेच्या वतीने सार्वजनिक हितासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याने, फी रक्कम कमी करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने केली होती. यासंदर्भात आयआयटी पवईचे प्रा. वेदगिरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही रक्कम 27 लाख करण्यात आली आहे. सुरुवातीला अर्धी रक्कम व त्यानंतर सहा आणि दहा महिन्यांच्या कालावधीनंतर प्रत्येकी 25 टक्के रक्कम अशी एकूण तीन टप्प्यांत ही रक्कम अदा केली जाणार आहे. त्याला स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.