Pimpri: महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड; आता तीन अतिरिक्त आयुक्त

स्थानिक अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी साहेबराव गायकवाड यांची प्रतिनियुक्तीवर बदली झाली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारीपदावरुन त्यांची महापालिकेत अतिरिक्त (अप्पर) आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यामुळे महापालिकेत आता तीन अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. दरम्यान, महापालिका अधिका-यांसाठी असलेल्या एका पदावर प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त आल्याने स्थानिक अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये केला आहे. ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे महापालिकेचा नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले होते. महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत.

त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यापूर्वी आलेले संतोष पाटील आणि अजित पवार हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. असे असताना आता पुन्हा तिसरे अतिरिक्त आयुक्तही प्रतिनियुक्तीवरील आले आहेत. त्यामुळे स्थानिक अधिका-यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गायकवाड हे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय कारणास्तव महापालिकेतील अप्पर आयुक्त या रिक्त पदावर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्याविषयीच्या कामकाजाबाबतचे गांभीर्य, तातडीची निकड आणि अपवादत्मक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांची बदली केल्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी याबाबतचा आदेश 30 एप्रिल रोजी काढला आहे. दरम्यान, गायकवाड आठ वर्षांपुर्वी पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त होते. साधारण सहा वर्ष त्यांनी महापालिकेत काम केले आहे. त्यामुळे त्यांना शहराची संपुर्ण माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.