Pimpri : शहरात तीन मतदान केंद्रावर असणार महिलाराज

एमपीसी न्यूज – महिला मतदारांना प्रोत्साहित करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी देखील ‘सखी’ मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. पिंपरी मतदारसंघातील पिंपरीगाव, चिंचवडमधील पिंपळेनिलख आणि भोसरी मतदारसंघातील निगडीत अशा तीन ठिकाणी ‘सखी’ मतदार केंद्र करण्यात आले आहेत. रांगोळ्या, फुगे लावून हे मतदार केंद्र सजविण्यात येणार आहेत, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने हा उपक्रम सुरू ठेवला. निवडणुकीत सखी, अर्थात “महिलांचे, महिलांसाठी आणि महिलांनी चालवलेले मतदान केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र करण्यात आले आहे. मतदान केंद्रात पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातात. त्यानुसार सखी मतदान केंद्रात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक, कर्मचारी यांचा समावेश असतो. त्याशिवाय पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी असते.

पिंपरी विधानसभेत मतदान केंद्र क्रमाकं 204 हे पिंपरीगावातील केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडले आहे. तर, भोसरी विधानसभेत निगडी यमुनानगरमधील अमृतानंदमयी शाळेत सखी मतदान केंद्र आहे. तर, चिंचवड विधानसभेत पिंपळेनिलख शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 358 सखी मतदान केंद्र आहे. सखी मतदान केंद्रात आवश्‍यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच, रांगोळ्या, फुगे लावून हे मतदार केंद्र सजविण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.