Pimpri: वेतनात भेदभाव!; आयुक्तसाहेब, कर्मचा-यांमधील असंतोषचा कधीही होईल उद्रेक; कर्मचारी महासंघाचा इशारा

कोरोनाविरोधात लढणा-यांना प्रोत्साहन भत्ता द्या, पूर्ण वेतन करा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत अत्यंत अल्प सहभाग असलेल्या वायसीएममधील ‘पीजी’ संस्थेच्या हंगामी प्राध्यपक, डॉक्टरांचे 100 टक्के वेतन अदा करुन महापालिका कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे महापालिकेच्या कायमस्वरुपी कर्मचा-यांमध्ये अंसतोष असून त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत कोरोना विरोधात लढणा-या महापालिकेच्या कायमस्वरुपी डॉक्टर, नर्रेस, कर्मचा-यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा. सर्वच कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे दुस-या टप्प्यातील पूर्ण वेतन अदा करावे, अशी मागणी कर्मचारी महासंघाने केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि महासचिव सुप्रिया सुरगुडे-जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. महापालिकेतील वर्ग एक ते तीनच्या कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात अदा करण्याबाबत आदेश काढले होते. त्यानुसार सर्व कर्मचा-यांची पगार कपात होणे आवश्यक असताना वायसीएममधील सर्वच हंगामी डॉक्टर प्राध्यापकांचे पगार एकरकमी म्हणजेच 100 टक्के अदा केले आहेत. यांचे वेतन प्रत्येकी एक लाखांपेक्षाही अधिक आहे. ही बाब अतिशय निराशाजनक आहे.

महापालिकेतील कायमसेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी महापालिकेचे वायसीएममधील डॉक्टर 14-14 तास काम करत आहेत. यामध्ये हंगामी डॉक्टरांचा अत्यंत अल्प सहभाग आहे. असे असताना त्यांना एकरकमी म्हणजेच 100 टक्के वेतन अदा करुन महापालिकेतील कर्मचा-यांमध्ये भेदभाव निर्माण केला आहे. यामुळे कर्मचा-यांमध्ये असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. याचा त्यांच्या कामकाजावर विपरीत परीणाम होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता त्वरित लागू करावा. महापालिकेतील सर्वच कर्मचा-यांचे मार्च महिन्याचे दुस-या टप्प्यातील वेतन त्वरित अदा करावे, अशी विनंती महासंघाने निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.