Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना वेतनवाढ!

एमपीसी न्यूज – स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि ‘एलजीएस’ हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. ‘एलजीएस’ उत्तीर्ण झालेल्या दहा लिपिकांची एक आणि ‘एलएसजीडी’ उत्तीर्ण झालेल्या पाच लिपिकांच्या दोन आगाऊ वेतनवाढी झाल्या आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (गुरुवारी) पारित केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ हे कोर्स उपयुक्त ठरतात. मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दोन्ही कोर्सर्चे प्रशिक्षण घेतले जाते. सरकारच्या निर्णयानुसार कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना एक आणि दोन जादा वेतनवाढ दिली जाते. ‘एलएसजीडी’ हा कोर्स करणाऱ्यांना दोन आणि ‘एलजीएस’ करणाऱ्यांना एक वेतनवाढ मिळते. या प्रशिक्षण सत्रासाठी महापालिकेमार्फत कर्मचा-यांची नेमणूक केली जाते.

दरम्यान, महापालिका कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर कोर्स उत्तीर्ण केल्याबद्दल दिली जाणारी जादा वेतनवाढ बंद केली होती. त्यावर महापालिकेने राज्याच्या नगरविकास खात्याकडे मार्गदर्शन मागविले होते. महापालिकेने सहावा वेतन आयोग लागू करण्यापुर्वी ठरविलेल्या धोरणानुसार वेतनवाढी पुर्ववत. परंतु, आगाऊ स्वरुपात मंजूर करण्यात येतील. तसेच यापुढे हा कोर्स उत्तीर्ण केल्यानंतर दिल्या जाणा-या वेतनवाढीला जादा वेतनवाढीऐवजी आगाऊ वेतनावढ संबोधले जाईल, असे स्पष्ट कळविले आहे.

महापालिकेच्या 15 कर्मचा-यांची ‘एलजीएस’ आणि ‘एलएसजीडी’ अभ्यासक्रमासाठी नेमणूक करण्यात आली होती. प्रशिक्षणामध्ये उत्तीर्ण झालेल्या कर्मचा-यांनी आगाऊ वेतनवाढी मिळण्याबाबत प्रशासनाकडे अर्ज केले होते. त्यानुसार आयुक्तांनी 15 कारकुनांना परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिनांकापासून आगाऊ वेतनवाढ नियमित वेतनवाढीच्या तारखेमध्ये बदल न करता. त्या दिनांकास त्यांचे जे पदनाम होते. त्या पदनामाच्या वेतनश्रेणीमध्ये तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षणामधील आक्षेप निरस्त होण्याच्या अधिन राहून मान्यता दिली. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.

  • ‘यांची’ झाली वेतनवाढ!
    ‘एलजीएस’ कोर्स उत्तीर्ण झालेले लिपिक दिनेळ कुदळे, रघुनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर ढवळे, रामदास देशमुख, रमेश सुर्यवंशी, सोमनाथ जाधव, नितीन येम्बर, पल्लवी बो-हाडे, प्रिती देवकर, अर्चना बाराथे यांची एक वेतनवाढ तर ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेले हरिभाऊ गावडे, प्रवीण उघडे, अंकुश लोहकरे, किरण तळपे आणि राजेंद्र चौधरी यांच्या दोन वेतनवाढी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.