Pimpri : वायसीएमएच्‌च्या दोन डॉक्‍टरांची वेतनवाढ रोखली

एमपीसी न्यूज – पूर्वसूचना देऊनही बैठकीला विनापरवाना गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयातील दोन डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन्ही डॉक्टरांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली.

डॉ. श्रीकांत सिद्राम शिंगे आणि डॉ. राहुल यशवंत साळुंखे यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच्‌)डॉ. शिंगे आणि डॉ. साळुंखे हे वैद्यकीय अधिकारी या गट ‘ब’ दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. अत्यावश्‍यक सेवेत मोडणा-या वैद्यकीय सेवेतील सर्व कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी चोवीस तास कर्तव्यास बांधिल आहेत. पोस्ट मार्टम विभागातील कामकाजबाबत चर्चा करण्यासाठी 26 एप्रिल 2016 मध्ये आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीची पूर्वसूचना देऊनही डॉ. राहुल साळुंखे बैठकीला गैरहजर राहिले. तसेच पोस्ट मार्टम नोट्‌स पोलीस खात्याकडे वेळेवर हस्तांतरित केल्या नाहीत. तर, डॉ. श्रीकांत शिंगे हे 21 मार्च ते 23 एप्रिल 2016 या दरम्यान विनापरवाना गैरहजर राहिले. त्यांच्या विनापरवाना गैरहजेरीमुळे पर्यायी व्यवस्था नसल्याने आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांना स्वत: शवविच्छेदन करावे लागले होते.

याप्रकरणी डॉ. शिंगे, डॉ. साळुंखे यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. डॉ. शिंगे विनापरवाना गैरहजर राहिल्याने पाच ते सहा मृतांचे शवविच्छेदनास आठ ते दहा तासांचा विलंब झाला. त्यामुळे नारिकांना ताटकळत थांबावे लागले होते. तर, डॉ. साळुंखे हे पूर्वनियोजित बैठकीस अनुपस्थित राहिल्याने पोस्ट मार्टम नोट्‌स पोलीस खात्याकडे वेळेवर हस्तांतरीत झाल्या नसल्याचे खातेनिहाय चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांनी खुलासा सादर केला होता. परंतु, तो खुलासा संयुक्तिक नाही. त्यामुळे विभागप्रमुखांनी डॉ. शिंगे, डॉ. साळुंखे यांची एक वेनतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात स्थगिक करण्याचा अहवाल सादर केला होता.

डॉ. साळुंखे व डॉ. शिंगे यांनी कर्तव्यात नितांत सचोटी, कर्तव्यपणा न राखता, हेतुपुरस्सर केलेला हलगर्जीपणा व बेजबाबदार वर्तणुकीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम, 1979 मधील तीनचा भंग केल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 56 (2)(ब), तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील 5 (1) (चार)मधील तरतुदीनुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. राहुल साळुंखे व डॉ. श्रीकांत शिंगे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केली आहे. तसेच या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे. यापुढे कोणत्याही स्वरुपाचे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.