Pimpri : कंत्राटी सफाई कर्मचा-यांच्या वेतनातून कोट्यवधींची लूट – यशवंत भोसले

आठ दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवणा-या 1600 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ठेकेदार दरमहा कोट्यवधी रुपयांची लूट करत आहेत. कर्मचाऱ्यांचे बँक पासबूक, डेबिड कार्ड ठेकेदारांनी काढून घेतले आहेत. एका कर्मचाऱ्यामागे पाच हजार असे महिन्याला तब्बल 80 लाख रुपयांची लूट ठेकेदारांकडून केली जात आहे, अशी सफाई कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांची लूट होत असल्याची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कल्पना दिली आहे. येत्या आठ दिवसात सफाई कर्मचा-यांच्या वेतनाचे पैसे महापालिकेने थेट त्यांच्या नावे खात्यात जमा करावेत. आयुक्तांनी कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी भोसले यांनी केली.

कासारवाडी येथे शनिवारी (दि. 2) झालेल्या पत्रकार परिषदेला योगेश जगदाळे, जोसेफ गायकवाड, दिनेश पाटील, दीपक पाटील, संतोष टाकळे उपस्थित होते.

यशवंत भोसले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. महापालिकेचे कर्तव्य पूर्ण करण्याचे काम कंत्राटी सफाई कर्मचारी करत असताना त्यांच्या पैशांची लूट होणे दुर्दंवी आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून महापालिका साफसफाईची कामे कंत्राटी कर्मचा-यांकडून करुन घेत आहे. सात ठेकेदारामार्फत ते काम करुन घेतले जात आहे. कंत्राटीपद्धतीने काम करणारे 1600 कर्मचारी आहेत. महापालिका त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे 13 हजार रुपये वेतन देत आहे. परंतु, संबंधित ठेकेदार कर्मचा-यांना कमी पैसे देत आहेत.

सफाई कर्मचा-यांच्या नावे बँकेत खाते आहे. डेबिड कार्ड आहे. परंतु, ठेकेदारांनी कर्मचा-यांकडून डेबीड कार्ड, पासबूक काढून घेतले आहे. ठेकेदार दर महिन्याला कर्मचा-यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतात. कर्मचा-यांना केवळ आठ हजार रुपये दिले जातात आणि दमबाजी करुन 13 हजार रुपये दिल्याच्या खोट्या सह्या कर्मचा-यांकडून करुन घेतल्या जात आहेत. एखाद्या कर्मचा-याने 13 हजार रुपये मागितल्यास त्याला कामावरुन काढून टाकले जाते. एका कर्मचाऱ्यामागे पाच हजार असे महिन्याला तब्बल 80 लाख रुपयांची लूट ठेकेदारांकडून केली जात आहे. तसेच दोन-दोन महिने वेतन दिले जात नसल्याचा कर्मचाऱ्यांची तक्रार असल्याचे, भोसले यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांच्या पैशांची ठेकेदारांकडून लूट होत असल्याचे आरोग्य अधिका-याने मान्य केले आहे. बँकेचे पासबुक आणि डेबीट कार्ड चोरीला गेल्याबाबत कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असता. बँकेतील खाते ठेकेदारांकडून बंद केले जात असल्याचा आरोप भोसले यांनी केला.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुढाकार घेऊन सफाई कर्मचाऱ्यांची होणारी लूट थांबवावी. त्यांना 13 हजार रुपये मूळ वेतन मिळावे. महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या नावे त्यांच्या खात्यावर थेट वेतन जमा करावे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबेल. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करुन येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भोसले यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.