Pimpri : टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये सप्टेंबर महिन्यात 20 टक्क्याची वाढ

एमपीसी न्यूज- देशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. यंदा 64 हजार 520 वाहनांची विक्री झाली असून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एकूण 53 हजार 964 वाहनांची विक्री झाली होती. त्याचप्रमाणे भारतीय बाजारपेठेमध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत टाटा मोटर्सच्या वाहनविक्रीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली असून यंदा विविध श्रेणीमधील 3 लाख 39 हजार 186 वाहनांची विक्री झाली. मागील वर्षी या कालावधीत 2 लाख 42 हजार 787 वाहनांची विक्री झाली होती.

देशांतर्गत बाजारपेठेत सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक वाहनांच्या विक्रीमध्ये 26 टक्के वाढ झाली असून यंदा 46 हजार 169 व्यावसायिक वाहने विकली गेली तर मागील वर्षी याच महिन्यात 36 हजार 687 वाहनांची विक्री झाली होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 2 लाख 32 हजार 487 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत 44 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी या कालावधीत 1 लाख 61 हजार 370 वाहनांची विक्री झाली होती. सर्व प्रकारच्या वाहनांची गुणवत्ता आणि बाजारात असलेली मागणी यामुळे ही वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक वाहन उत्पादन क्षेत्रामध्ये होत असलेल्या वृद्धीचाही या विक्री वाढीमध्ये महत्वाचा वाटा आहे.

अवजड व्यावसायिक ट्रक (एचव्हीसी)प्रकारच्या वाहन विक्रीमध्ये टाटा मोटर्सने 32 टक्क्यांची विक्रमी वाढ केली असून यंदा 16 हजार 239 वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी 12 हजार 259 वाहनांची विक्री झाली होती. सिग्ना आणि प्रिमा ट्रक्स आणि टिपर्सच्या बाजारातील मागणीचा तसेच सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे. रस्त्यांची उभारणी, सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, सिंचन प्रकल्प अशा पायाभूत सुविधांबरोबरच सरकारतर्फे सिमेंट, कोळसा आणि स्टील उद्योगाला मिळणारी चालना वाहनविक्रीसाठी पूरक ठरली आहे. त्याचप्रमाणे इ कॉमर्स, एफएमसीजी, ऑटो करिअर्स, ऑइल टँकर्स या बाबीसुद्धा माध्यम आणि अवजड वाहन विक्रीच्या वृद्धीसाठी कारणीभूत ठरल्या आहेत.

टाटा मोटर्सच्या हलक्या व्यावसायिक वाहन (एलसीव्ही ट्रक) प्रकारातील वाहन विक्रीने 23 टक्क्यांची जोमदार वाढ झाली असून यंदा या प्रकारात 5 हजार 465  वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी 4 हजार 449 वाहनांची विक्री झाली होती. नवीन टाटा अल्ट्रा श्रेणी ट्रकच्या लोकप्रियतेचा आणि मागणीचा यामध्ये मोलाचा वाटा आहे. कृषी कर्जमाफी आणि किमान आधारभूत किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून त्याचा परिणाम एलसीव्ही ट्रकच्या विक्रीमध्ये दिसून आला आहे.

लहान व्यावसायिक वाहन (एससीव्ही) म्हणजे कार्गो, पिकअपप्रकारच्या वाहनविक्रीमध्ये 24 टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली असून यंदा 19 हजार 846 वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी 15 हजार 607 वाहनांची विक्री झाली होती. इ कॉमर्स क्षेत्रातील प्रगती तसेच एससीव्ही कार्गोचा या वाढीमध्ये मोलाचा वाटा आहे. हब-स्पोक मॉडेलचा विकास आणि ग्रामीण भागातील वाढत्या वापरामुळे लहान वाहनांची मागणी वाढली आहे.

व्यावसायिक प्रवासी वाहनाच्या विक्रीमध्ये (सी व्ही पॅसेंजर) 6 टक्के स्थिर स्वरूपाची वाढ झाली असून मागील वर्षभरात 4 हजार 619 वाहनांची विक्री झाली आहे.

खासगी प्रवासी वाहन (Domestic – Passenger Vehicles) विक्रीमध्ये 7 टक्के वाढ झाली असून सप्टेंबर महिन्यात 18 हजार 429 वाहनांची विक्री झाली. मागील वर्षी 17 हजार 286 वाहनांची विक्री झाली होती. खासगी प्रवासी वाहन उत्पादन क्षेत्रामध्ये मंदी जाणवत असतानाही टाटा मोटर्सच्या या प्रकारातील वाहन विक्रीच्या वृद्धीचा हा सलग तिसरा महिना आहे. टाटा मोटर्सच्या नवीन पिढीला आकर्षित करणाऱ्या वाहनांच्या सातत्याने होणाऱ्या जोरदार मागणीमुळे निरंतर वाढ होत आहे. टिआगोच्या लोकप्रियतेनंतर नुकत्याच लॉन्च केलेल्या टिआगो एनआरजी, नेक्सन एएमटी आणि नेक्सन मुळे ग्राहकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.

नेक्सन क्रॅझ लिमिटेड या गाडीला सुद्धा प्रचंड मागणी असून बाजारात या गाडीने लोकप्रियता मिळवली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2018 या कालावधीत खासगी वाहन श्रेणीमध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये 31 टक्के वाढ झाली असून एक लाख 6 हजार 865 वाहनांची विक्री झाली असून मागील वर्षी याच कालावधीत 81 हजार 417 वाहनांची विक्री झाली होती.

मागील आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहन आणि खासगी वाहनाच्या निर्यातीमध्ये सप्टेंबर 2018 मध्ये 35 टक्के वाढ झाली असून 5 हजार 250 वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात 3 हजार 887 वाहनांची विक्री झाली होती. नेपाळ मधील उत्सव काळामध्ये आणि बांगला देशामध्ये ईदमुळे व्यावसायिक वाहनांच्या निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.