Pimpri : गुरुवारी विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन

एमपीसी  न्यूज – समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आयोजित दहावे एक दिवसीय विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

हे संमेलन  गुरुवारी  (दि. 03 जानेवारी 2019) आकुर्डी येथील  श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट सांस्कृतिक भवनात होणार आहे. या संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, पत्रकार रमेश पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेआठ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शरदराव कुंटे, आनंदवन भूजल-शाश्वत सहयोगचे भास्कर गोखले आणि प्रतिभा महाविद्यालयाचे विश्वस्त डॉ.राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित असणार आहेत.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात जन्मशताब्दीवर्षाचे औचित्य साधून मीना पोकरणा यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी तोफखाने ( ग.दि.माडगूळकर ), प्रदीप गांधलीकर ( पु.ल.देशपांडे ) आणि पद्माकर पाठकजी ( सुधीर फडके ) हे या तीन दिग्गजांची व्यक्तिमत्त्वे उलगडून सांगतील. भोजनोत्तर दुसऱ्या सत्रात राजेंद्र घावटे संचलित प्रश्नमंजुषा या सामान्यज्ञानावर आधारित कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतील.

संमेलनाच्या प्रत्येक सत्रात पिंपरी-चिंचवड शहरातील तेरा महाविद्यालयांचे निवडक विद्यार्थी पथनाट्य सादर करतील. समरसता साहित्य परिषद ( महाराष्ट्र प्रांताध्यक्षा ) डॉ.श्यामा घोणसे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप आणि बक्षीसवितरण समारंभ होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (पिंपरी-चिंचवड संघचालक) डॉ.गिरीश आफळे तसेच नॉव्हेल शैक्षणिक समूहाचे संस्थापक अमित गोरखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.

विनाशुल्क असलेल्या या एक दिवसीय संमेलनाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड) शाखाध्यक्षा शोभा जोशी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.