Pimpri : जनगणना कायद्यान्वये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी झाल्यास आक्षेप नाही – खालीलूर्रहमान सज्जाद नेमानी

एमपीसी –  जनगणना कायद्यान्वये आजवर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) करण्यात आली आहे. मात्र, यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये (सीएए) एनपीआर केली जाणार आहे. सीएएद्वारे होणार राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला आमचा आक्षेप असून जर सरकारने जनगणना कायद्यान्वये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी केली तर त्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नसेल, अशी भूमिका तर्जुमान ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे खालीलूर्रहमान सज्जाद नेमानी यांनी मांडली.

सीएए, एनपीआर, एनआरसीच्या विरोधात कुल जमाअती तंजीम पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने संविधान बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात 42 संघटना संविधान बचाव समितीच्या माध्यमातून काम करत आहेत. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ ही परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

खालीलूर्रहमान सज्जाद नेमानी म्हणाले, “भारतातील प्रत्येक मुस्लिम भारतीय जमिनीचा सच्चा पाईक आहे. देशातील अनेक नागरिक कागदपत्रे सादर करू शकणार नाहीत. जे नागरिक कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल आणि त्या नागरिकांना देशात अनधिकृतपणे राहत असल्याचे घोषित करेल. हा सरकारचा डाव आहे. सीएए, एनपीआर, एनआरसी व्यतिरिक्त सरकारला करण्यासारखी अनेक कामे आहेत. ती सोडून सरकार यामागे का लागले आहे, हे समजू शकले नाही. सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे. मोहल्ला कमिटी बनवून एनपीआरचा निषेध करा. एनपीआरचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाशी सौजन्याने वागा आणि माहिती देण्यास नकार द्या. कायद्याच्या चौकटीत, संविधानाचा आदर राखून हा विरोध करावा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत तुकाराम महाराजांचे हे राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोणावर अन्याय केला नाही. त्यांच्या राज्यात नागरिकांवर अन्याय केला जात आहे.”

माजी खासदार उबेदुल्लाह खान आजमी म्हणाले, “भारतावर इंग्रजांनी सत्ता स्थापन केली तेंव्हा त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंदू, मुस्लिम, शीख, जैन अशा सर्व धर्मियांनी मिळून एकत्रित लढा दिला. स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व धर्मियांनी एकत्र होऊन प्राणांची आहुती दिली. प्रत्येक मुस्लिमांना आपल्या जन्मभूमीबद्दल आदर आहे. मुस्लिमांना देशातून बाहेर काढण्याची भाषा बोलली जाते. भारताचे संविधान भारताचा अभिमान आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. संविधानाने एकतेची शिकवण दिली. आचार, विचार, धार्मिक स्वातंत्र्य दिले. त्याच संविधानावर आच आणली जात आहे. त्याबाबत आता सर्वधर्मीयांनी एकमूठ बांधली आहे. स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी देखील आहुती द्यावी लागत आहे. सर्व बांधवांनी आपल्या मागण्यांवर कायम राहावे.”

दिल्लीतील हिंसाचाराचे कोणतेही पडसाद शहरात उमटू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. राखीव पोलिसांच्या दोन पलटणी एक दिवस आधीच शहरात दाखल झाल्या. निषेध परिषदेसाठी 28 अधिकारी, 228 कर्मचारी असा भलामोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रम शांततेत पार पडला. स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.