Pimpri : पिंपरीत संविधान बचाओ परिषद; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – सीएए, एनपीआर, एनआरसीच्या विरोधात कुल जमाअती तंजीम पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने संविधान बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ ही परिषद रविवारी (दि. 1) होत आहे.

तर्जुमान ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे खालीलूर्रहमान सज्जाद नेमानी, जमाअते इस्लामी ए हिंदचे एस अमिनूल हसन आणि माजी खासदार उबेदुल्लाह खान आजमी हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. उपस्थित मान्यवर सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) च्या विरोधात मागील अनेक दिवसांपासून देशभर आंदोलने सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात देखील निषेध आंदोलनांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक वेळी नामांकित वक्त्यांना बोलावून उपस्थित नागरिकांना भाषण दिले जात आहे. सरकारच्या विरोधातील निषेध या परिषदांमधून व्यक्त होत आहे.

दिल्लीतील हिंसाचाराचे कोणतेही पडसाद शहरात उमटू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. राखीव पोलिसांच्या प्लाटून एक दिवस आधीच शहरात दाखल झाल्या आहेत. वाढीव बंदोबस्त पोलिसांनी या निषेध परिषदेसाठी तैनात केला आहे. सकाळपासून पिंपरी परिसरात पोलिसांचा वावर वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.