Pimpri: …तर आनंदनगरमध्ये नागरिकांचा उद्रेक झाला नसता, संदीप वाघेरेंची प्रशासनावर टीका

Pimpri: Sandeep Waghere's criticism on the administration for anandnagar citizens outbreak सुमारे २३०० घरे असलेल्या आनंदनगर भागामध्ये नागरिकांची संख्या १०००० च्या वर आहे. ही बाब महापालिकेच्या वेळीच लक्षात यायला हवी होती.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेन्टमेंट झोनमधील (प्रतिबंधित क्षेत्र)नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे त्वरित वाटप सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे. प्रशासनाने सुविधा पुरवल्या असत्या तर आनंदनगरमधील नागरिकांचा उद्रेक झाला नसता, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. महापालिकेचे प्रशासन मात्र कोणतीही सक्षम यंत्रणा राबवित नसल्याचे दिसून येत आहे.

चिंचवड येथील आनंद नगर मधील नागरिकांचा उद्रेक हे याचे उत्तम उदाहरण आहे. लॉकडाउनमध्ये संपूर्ण समाजाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेषत: हातावर पोट असणारे, रोज काम केल्याशिवाय उदरनिर्वाह होऊ न शकणारे, कारखान्यातील, बांधकाम क्षेत्रातील, रस्त्यांची तसेच ठेकेदारांकडे काम करणारे मजूर आदींच्या बाबतीत दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे.

शहरामध्ये इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, बजाज, टाटा अनेक संस्थांनी सलग दोन महिने स्वयंसेवी संस्था, संघटनांमार्फत शहरातील गरीब गरजू लोकांना जेवण पुरविले जात होते. त्यामुळे रोज सव्वा ते दीड लाख लोकांपर्यंत जेवण पुरविण्यात या समाजसेवी संस्थांना यश आले होते.

महापालिकेस जिल्हा अन्नधान्य वितरण कार्यालयाने पाठविलेला गहू व तांदूळ चांगल्या दर्जाचा नसल्याची तक्रार काही स्वयंसेवी संस्थांनी केली होती तर काही संस्थांनी हे धान्य स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे महानगरपालिकेने हा धान्य पुरवठा बंद केला होता.

शहरातील प्रत्येक स्वयंसेवी संस्था व संघटना आपल्या परीने शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करीत होते. परंतु महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हॉटस्पॉट असलेल्या आनंदनगर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.

सुमारे २३०० घरे असलेल्या आनंदनगर भागामध्ये नागरिकांची संख्या १०००० च्या वर आहे. ही बाब महापालिकेच्या वेळीच लक्षात यायला हवी होती. वेळीच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला गेला असता तर ही वेळच आली नसती.

नको त्या ठिकाणी नको तितके रुपये महापालिका खर्च करीत असते. मग गरीब गरजू नागरिकांसाठी खर्च का केला जात नाही. पुणे महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचे जवळपास ७००००च्या वर रेशनिग किटचे वाटप केले.

मग आपल्या शहरातील नागरिकांना अशा योजना का राबविल्या जात नाही ? का फक्त अधिकार्‍याना एसीमध्ये बसून कागद रंगवायची कामे दिली आहेत? स्थानिक पातळीवर जाऊन तेथील नागरिकांना कुठल्या प्रकारची मदत हवी आहे याची विचारणा व्हायला हवी.

शहरातील झोपडपट्टीतील १४७८१० लोकसंख्या आहे. यावर महापालिकेने प्रामुख्याने लक्ष केंद्र केले पाहिजे. नाहीतर आनंदनगर सारख्या घटनांना वारंवार सामोरे जावे लागणार आहे.

यासाठी महापालिकेच्या वतीने समिती गठित करण्यात यावी व शहरातील सर्वच झोपाडपट्टी व दाट वस्तीच्या ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात यावे. कंटेन्टमेंट झोनमधील गरीब गरजू कुटुंबांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप महापालिकेच्या वतीने करण्यात यावे अशी आग्रही मागणी वाघेरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.