Pimpri : सांगवी, वाकड, भोसरीमध्ये घरफोड्या; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, वाकड आणि भोसरी एमआयडीसी परिसरात तीन घरफोडीचे प्रकार समोर आले. तिन्ही घटनांमध्ये एकूण 1 लाख 25 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगला मधुकर बि-हाडे (वय 32, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली. बुधवारी (दि. 21) सकाळी नऊच्या सुमारास मंगला कामानिमित्त बाहेर गेल्या. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून 23 ग्राम वजनाचे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुपारी तीनच्या सुमारास मंगला घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलीस ठाण्यात विशाल सीताराम कस्पटे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली. वाकड स्मशानभूमीजवळ असलेल्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी 47 हजार रुपये किमतीच्या पितळ व तांब्याचे धातूच्या फायबरमध्ये बनवलेल्या 22 चाव्या चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 21) पहाटे घडली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सांगवी पोलीस ठाण्यात अमितकुमार दिलीप माने (वय 32, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. अमितकुमार यांचे पिंपळे गुरव येथे 60 फुटी रोडवर ओंकार कॉलनी येथे मालन मेडिकल स्टोअर नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि. 21) पहाटे अज्ञात चोरट्यांनी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून 8 हजार 500 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.