Pimpri: कंत्राटी सफाई कामगारांचे तीन महिन्यापासून वेतन थकले; कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या बंगल्यासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते झाडलोट करण्या-या कंत्राटी सफाई कामगारांचे तीन महिन्यापासून वेतन थकले आहे. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी आज (शनिवारी) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोरवाडीतील बंगल्यासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी कर्मचा-यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत कायमस्वरुपी असलेले 1 हजार 700 सफाई कर्मचारी तर कंत्राटी तत्त्वावर 1 हजार 529 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचा-यांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता राखली जाते. सात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी पुरविले जातात. या सर्व कंत्राटी कर्मचा-यांना ईएसआय, पीएफ व किमान वेतन दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी या कर्मचा-यांच्या संघटनांकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे नव्याने काढलेल्या निविदांमध्ये या सर्व कर्मचा-यांना या सुविधा पुरविण्यासह कर्मचा-यांची ‘बायोमेट्रीक’ हजेरी असण्याचा नियम, अटी व शर्तींमध्ये समावेश करण्यात आला.

काही ठेकेदारांनी या कर्मचा-यांना “ईएसआय’ व “पीएफ’ सुविधा पुरवायला सुरुवात केली असून त्याचे पुरावे आरोग्य विभागाला सादर केले आहेत.  मात्र, किमान वेतन दिल्याचा पुरावा सादर करण्यासाठी ‘बँक स्टेटमेंट’ सादर न करु शकलेल्या ठेकेदारांची पालिकेने बीले रोखली आहेत. यामुळे कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले. वेतनाविना कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहेत.

वेतन मिळाले नसल्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी आज (शनिवारी) मोरवाडीतील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर दुपारी एकच्या सुमारास ठिय्या मांडला. वेतन देण्यात यावे या मागणीसाठी जवळपास दीड तास कर्मचा-यांनी ठिय्या मांडला होता. गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळाले नाही. आम्ही संसार कसा चालवायचा. ठेकेदारांनी आमचे एटीएम कार्ड देखील काढून घेतले आहेत. किमान 11 हजार वेतन असताना आम्हाला केवळ सात हजार रुपयेच वेतन मिळत असल्याचे, आंदोलक महिलांनी सांगितले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी समजूत काढत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.