Pimpri: महापालिका, ‘वायसीएम’च्या प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायझर टनेल’ बसवा – नाना काटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका मुख्यालय आणि ‘वायसीएम’च्या प्रवेशद्वारावर कर्मचा-यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यासाठी  ‘सॅनिटायझर टनेल’ बसविण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

याबाबत काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की,  शहरामध्ये आजअखेर पर्यंत 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यापैकी 12 रुग्णांवर यशस्वी वैद्यकीय उपचार करण्यात येऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये 10 सक्रिय रुग्णांवर यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत.

राज्यात तसेच पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. परंतु, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अजून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.शहरातील कोरोना रुग्णांवर यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. या रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई  कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील  कर्मचारीवर्ग यांना संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे.

त्या दृष्टीने यशवंतराव चव्हाण स्मृतीरुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर तसेच मनपाच्या मुख्यालयातील प्रवेशव्दारावर कर्मचा-यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यासाठी  सॅनिटायझर टनेल बसविण्यात यावा.  थर्मल स्कँनरची सोय करण्यात यावी. म्हणजे  अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.