Pimpri : संस्कार ग्रुप विरोधात फक्त 450 ठेवीदारांची तक्रार

पोलिसांकडून 81 मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज- संस्कार ग्रुपच्या विरोधात फक्‍त दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आत्तापर्यत 100 कोटींच्या ठेवींबाबत 10 हजारांपैकी फक्त 450 ठेवीदारांनी 19 कोटी 45 लाख रुपयांनी लेखी तक्रार पोलिसात केली आहे. यामुळे संस्कार ग्रुपच्या 81 मालमत्ता पोलिसांनी सील करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. आगामी काळात शासनाची परवानगी घेऊन 450 ठेवीदारांचे पैसे परत दिले जाण्याची शक्‍यता आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने संस्कार ग्रुपचा मास्टर माईंड वैकुंठ कुंभार, त्याची पत्नी राणी कुंभार आणि मेहूणा रामदास शिवले यांना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक केली आहे. संस्कार ग्रुपच्या 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर चार जणांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. उर्वरित सात जणांना आगामी काळात अटक होण्याची शक्‍यता आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संस्कार ग्रुपचा तपास आला. आत्तापर्यंत 450 गुंतवणूकदारांनी 19 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे पोलिसांनी संस्कार ग्रुपच्या 59 मालमत्ता जप्त केल्या तर उर्वरित 22 मालमत्ता या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. या सर्व 81 मालमत्ता जप्त करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. शासकीय दराप्रमाणे या मालमत्तेची किंमत अंदाजे 20 कोटींच्या आसपास आहे. तर बाजारभावाप्रमाणे याच मालमत्तेची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे. शासनाची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचे पैसे परत करू शकतात.

फसवणूक झालेल्या व्यक्तींना तक्रार दाखल करण्याचे आवाहन

आपण तक्रार केल्यास आपले पैसे संस्कार ग्रुप परत देणार नाही, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत असल्याने अनेकांनी तक्रार दिलीच नाही. यामुळे पोलिसांकडे ज्या गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांचे पैसे प्राधान्याने दिले जाणार आहे. मग तक्रार न केलेल्या उर्वरित गुंतवणूकदारांच्या पैशाचे काय, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. मात्र अजूनही तक्रार घेण्यास तयार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.