Pimpri: संस्कार प्रतिष्ठानची दिवाळी पूरग्रस्त आदिवासी, कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरीसोबत!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने भामरागड येथील पूरग्रस्त आदिवासी, आनंदवनमधील कुष्ठरोगी बांधव व लोकबिरादरी येथे कपडे व साखरदान करून दिवाळी साजरी करण्यात आली. 

 

संस्कार प्रतिष्ठानने सलग चौथ्या वर्षीची दिवाळी गडचिरोली येथील अतिसंवेदनील व नक्षलग्रस्त भागातील पूरग्रस्त भामरागड, जिमलगड, आलापल्ली, पेरूपल्ली, हेमलकसा येथील आदिवासी बांधवांसोबत साजरी केली.

 

भामरागड, गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून 4,000 साडया, 2,000 पुरुषांचे पोशाख, 1,000 महिलांचे पोशाख, 500 लहान मुलांचे पोशाख, गरोदर महिलांसाठी 50 प्रोटीन्सचे डबे, लहान मुलांसाठी 100 चवनप्राशचे डबे, 500 कोलगेट टुथपेस्ट, 1,000 आकाश कंदील 1,000 पारले बिस्किट पुडे, 1,000 पणत्या असे साहित्य घेऊन 21 ऑक्टोबरला चिंचवड येथून 31 सभासद गेले होते.

 

आनंदवनातील 350 कुष्ठरोगी महिलांना साड्यांचे वाटप केले तसेच आनंदवनला 200 किलो साखर भेट दिली. आनंदवनातील कुष्ठरोगी महिलांसोबत खूप गप्पागोष्टी केल्या. आपल्याला कोणीतरी दिवाळीनिमित्त साड्यांचे वाटप केले, यावर प्रथम त्यांचा विश्‍वासच बसत नव्हता. संस्कार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आशीर्वाद रूपाने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

 

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला 200 किलो साखर आणि 75 हजार रुपयांची औषधे, 400 साड्या व 25 आकाश कंदील मदत म्हणून डॉ. प्रकाश आमटे यांना भेट दिली. परिसरातील व हॉस्पिटलमध्ये येणा-या आदिवासी भगिनींना साडयांचे वाटप करण्यात आले.

 

भामरागड परिसरातील आदिवासी पाड्यांवर /वस्त्यांवर जाऊन घरांना आकाश कंदील लावून त्यांना साड्या, कपडे, साखर व मिठाईचे वाटप केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागडच्या प्रांगणात 7,000 हजार आदिवासींना तहसीलदार कैलास अंडील व उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या हस्ते वरील साहित्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता परिसरातील वस्त्यांवर जाऊन त्यांच्या वस्तीसमोर आकाश कंदील लावून, रांगोळी काढून पणत्या लावल्या व साडी, साखर वाटप केले.

 

जिमलगट्टा परिसरातील आदिवासी पाड्यांवर, वस्त्यांवर जाऊन घरांना आकाश कंदील लावून त्यांना साड्या, कपडे, आकाश कंदील, साखर व मिठाईचे वाटप केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा यांच्या कार्यालयाच्या प्रांगणात आदिवार्सीना 1,200 साडया आणि अन्य साहित्याचे वाटप उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते केले.

 

संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी या उपक्रमाचे संयोजन केले होते. हे आदिवासी बांधव 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरातून आले होते. कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

 

संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधिलकी जोपासत दीपावलीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आदिवासी अनाथ वृध्दाश्रम अशा ठिकाणी जाऊन कपडे, फराळ, आकाश कंदील यांचे वाटप करीत असतात.

 

या उपकमाला टेन इलाईट सोसायटी, गुरव पिंपळे, सातारा मित्र मंडळ, सांगवी, सुश्रुत आयुर्वेद निकेतन, चिंचवड सहगामी फौंडेशन, रावेत, साई किड्स, चिंचवडगाव, पिं. चिं. मनपा सेवानिवृत्त शिक्षक संघटना यांनी साहित्य जमा करण्यासाठी मदत केली. रुपाली नामदे, प्राजक्ता रूद्रवार, सोमनाथ कोरे यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला. सातारा जिल्ह्यातून 9 पोती कपडे व 20 किलो साखर जमा झाली. जालना जिल्ह्यातून  3 पोती कपडे व 25 किलो साखर दान मिळाली.

 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश सरदेसाई, शिवकुमार बायस, आनंद पुजारी, प्रिया पुजारी, रमेश भिसे, मोहिनी कर्णिक, मनीषा आगम, विजय आगम, मृगेंद्र डमकले, वसंत दळवी, प्रभाकर मेरूकर, अनुषा कराळे, रूपाली खद, बळवंत ठुबे, मीलन गायकवाड, दुष्यंत बच्छाव, संदीप अवचार, राखी नातू, मंगल फरांदे, परिमल बर्वे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.