Pimpri: शालेय विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार द्या; महापौरांची बचतगटांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार देण्यात यावा, अशी सूचना महापौर राहुल जाधव यांनी सर्व बचतगटांना दिल्या.

शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वेळेत सकस पोषण आहार देण्याबाबत महापौर कार्यालयात पोषण आहार पुरविणा-या बचतगटांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर जाधव यांनी बचतगटांना सूचना दिल्या. प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी पराग मुंडे, विभागीय पर्यवेक्षक, शालेय पोषण आहाराचे काम पहाणारे संबंधित कर्मचारी व 38 बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, आपण सर्व शाळांची पाहणी केलेली आहे. शहरातील विद्यार्थ्यांना सकस, पूरक पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखावी. आहार साहित्य चांगल्या दर्जाचे वापरावे. आता जसा पोषण आहार दिला जातो. तसाच यापूढेही देण्यात यावा. मी अचानक शाळांना भेट देणार आहे. त्यामध्ये पोषण आहाराची गुणवत्ता दिसून न आल्यास कारवाई करण्यात येईल.

यामध्ये हलगर्जीपणा होता कामा नये. तसेच पोषण आहार पुरवठा करणा-या बचत गटांना त्याचे बिलही वेळेत देण्याबाबत महापौर जाधव यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.