Pimpri : सायन्स पार्क उपकरणांना आयात शुल्कात सवलत, महापालिकेची 2 कोटी 62 लाख रुपयांची बचत

सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तारांगण प्रकल्पात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार असून ही यंत्रसामुग्री जपान, अमेरिका आणि फ्रान्स या देशातून आयात करण्यात आली आहे. या यंत्रसामुग्रीवर केंद्र सरकारने 3 कोटी 19 लाख रुपयांचे आयातशुल्क आकारणी केली. तथापि, सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या विशेष प्रयत्नामुळे केवळ 56 लाख 67 हजार रुपयांचे आयातशुल्क भरावे लागले. प्रवीण तुपे यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेच्या 2 कोटी 62 लाख रुपयांची बचत झाली.

अंतराळ क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभागही मोलाचा असावा, या उद्देशाने मुंबई येथील नेहरु तारांगणाच्या धर्तीवर महापालिकेच्या सायन्स पार्कमध्ये तारांगण साकारले जात आहे. चिंचवडस्टेशन येथील सायन्स सेंटरच्या बाजूलाच तारांगण प्रकल्प उभारण्यात येत असून त्याच्या बांधकामासाठी 15 कोटी रुपये खर्च झाला आहे.

तारांगणसाठी ’हायब्रीड प्रोजेक्शन सिस्टीम’, ’प्रोजेक्शन डोम’, प्रोजेक्टर आणि अन्य उपकरणे जपान, अमेरिका आणि फ्रान्स या देशातून आयात करण्यात आली आहेत. ही यंत्रसामुग्री परदेशातून आयात केल्यामुळे केंद्रीय सीमाशुल्क विभागाने आयात शुल्कापोटी 3 कोटी 19 लाख रुपये भरावे, असे महापालिकेला कळविले. तारांगण हा शैक्षणिक प्रकल्प असल्याने आयात शुल्कामध्ये विशेष सवलत द्यावी, अशी विनंती सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सीमाशुल्क विभागाला केली.

तसेच, पत्रव्यवहार करत, संवाद साधत घसघशीत सवलत मिळवली. त्यामुळे केवळ 56 लाख 67 हजार रुपयांचे आयात शुल्क भरावे लागले. प्रवीण तुपे यांच्यामुळे पिंपरी महापालिकेच्या 2 कोटी 62 लाख रुपयांची बचत झाली. यंत्रसामुग्री आयात करताना आयात शुल्कामध्ये सवलत मिळाल्यास त्याचा फायदा कंत्राटदारास न होता पिंपरी महापालिका घेईल अशी अट निविदेमध्ये असल्याचेही तुपे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.