Pimpri: महापालिकेकडून शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी; नगरसेवक, संस्थांनी फवारणी करु नये – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्याकरिता कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचा-यांना करु नये. नगरसेवक,  खासगी संस्थांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणी करु नये,  असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. सरकारच्या निर्देशानुसार औषध फवारणी करणे बेकायदेशीर असून कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करण्यास परवानगी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

जंतूनाशकाच्या केल्या जाणा-या फवारणीमुळे अपाय होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी करु नये आणि करायची असल्यास संबंधित महापालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करुन आवश्यकता भासल्यास स्वत: फवारणी करेल,  असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेवक,  खासगी संस्थांनी फवारणी करु नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

शहरामध्ये कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहेय त्याकरिता उपाययोजना म्हणून नगरसेवक, काही नागरिकांकडून, खासगी संस्थांकडून त्यांच्या परिसरामध्ये स्वेच्छेने औषध फवारणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करणे बेकायदेशीर आहे. कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणेस परवानगी नाही.

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून औषध फवारणी करण्याची आवश्यकता नाही. शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्याने औषध फवारणी करण्यात येत आहे.

आरोग्य विभागामार्फत करण्यात येणारी औषध फवारणी ही शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचा-यांना करु नये. सबब कोणत्याही नागरिक, खासगी संस्था अथवा नगरसेवकांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणीची कार्यवाही करु नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.