Pimpri : ‘पुणे मेट्रो’ची दुसरी ट्रेन रुळावर; मेट्रोची पहिली ट्रायल घेणार

एमपीसी न्यूज – नागपूर येथून पुण्यात आणलेल्या दोन्ही मेट्रो ट्रेन रुळावर चढवण्यात आल्या आहेत. दोन्ही ट्रेनच्या सहाय्याने संत तुकारामनगर ते फुगेवाडी यादरम्यान पुणे मेट्रोची पहिली ट्रायल घेण्यात येणार आहे.

महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन)चे तीन डबे (कोच) रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. त्यानंतर, आणखी तीन कोच शहरात आले. सुरुवातीला पहिल्या तीन कोचची एक मेट्रो ट्रेन रुळावर चढवून तिचे उदघाटन करण्यात आले. तर, त्यानंतर दोन दिवसांनी आणखी एक मेट्रो ट्रेन रुळावर चढविण्यात आली आहे.

पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महा मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत. मेट्रोचे दोन संच नागपूरहुन पुण्यात आणले आहेत. पुण्यात कोच डेपोचे काम अद्याप झाले नाही. त्यामुळे कोचमध्ये विविध उपकरणांची फिटिंग आणि चाचण्या करण्यासाठी पुणे मेट्रोला नागपूरवर अवलंबून राहावे लागत आहे.

सुरुवातीला आणलेले दोन संच नागपूर येथील कोच डेपोमध्ये प्राथमिक चाचण्या, फिटिंगची कामे आणि रंगसंगती व सजावट करून पुण्याकडे रवाना करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये आणखी दोन मेट्रो ट्रेन आणल्या जाणार आहेत. त्या वनाज ते रामवाडी या मार्गावरील चाचणीसाठी वापरल्या जाणार आहेत. एकूण चार मेट्रो ट्रेनच्या साहाय्याने पुणे मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरु होईल.

मेट्रोच्या कामामुळे कासारवाडी ते पिंपरी मार्गावर वाहतूककोंडी
पिंपरी येथील एच ए कंपनीजवळ मोठ्या क्रेनच्या सहाय्याने मेट्रोचे कोच रुळावर चढविण्यात आले. या कामासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून कासारवाडी ते पिंपरी या दरम्यानच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नाशिक फाटा येथून महामार्गाने जाणा-या वाहनांना पिंपरी-कासारवाडी या विरुद्ध दिशेच्या लेनवरून वाहुतकीसाठी रस्ता खुला केला आहे. तर या दरम्यानची सर्व्हिस रस्त्यावरील वाहतूक एच ए कंपनीजवळ बंद ठेवण्यात आली आहे. कासारवाडी येथून पिंपरीकडे जाणा-या वाहनांना एच ए कंपनीपासून पिंपरी गावात जाण्यासाठी रस्ता ठेवला आहे. मात्र, अनेक वाहन चालकांना या बदलाबाबत कल्पना नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, एच ए कंपनीसमोर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.