Pimpri : कलम 353 रद्द करण्याचा मुद्दा विधिमंडळात मांडण्याची अपना वतन संघटनेची मागणी

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले लेखी निवेदन

एमपीसी न्यूज – कलम ३५३ रद्द करण्याचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात यावा, अशी मागणी अपना वतन संघटनेने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, सामान्य नागरिक, कार्यकर्ते आपल्या व्यक्ती किंवा सामाजिक विषयावर संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करतात. परंतु काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून राजकीय दबावापोटी किंवा काही आर्थिक अपेक्षेपोटी कामामध्ये दिरंगाई केली जाते. नागरिकांची कामे मुद्दामहून अडकवून ठेवली जातात. त्यावेळेस अनेकवेळा पाठपुरावा करूनही सरकारी यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि त्रास होतो.

  • अशावेळी वैतागून नागरिकांकडून अधिकाऱ्यांना जाब विचारला जातो किंवा सामाजिक संघटनांकडून आंदोलन केले जाते. परंतु अशावेळी सरकारी अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांवर किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ३५३ कलमचा गैरवापर केला जातो.

सुधारित ३५३ कलमानुसार हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात आला आहे. तसेच शिक्षा वाढून २ ऐवजी पाच वर्षे करण्यात आली आहे. हि सुधारणा झाल्यापासून महारष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सामाजिक चळवळीमध्ये काम करण्यासाठी कार्यकर्ते धजत नाहीत.

  • या मागणीबाबत पिंपरी-चिंचवड शहरात जनजागृती चालू आहे. काही दिवसांतच पुढील दिशा ठरेल, यामध्ये शहरातील ४५ संघटना सहभागी होणार आहेत.त्यामुळे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ पाहता आपण कलम ३५३ बाबत सुधारणा करणेबाबत किंवा रद्द करणेबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडावा.

यावेळेस शिष्टमंडळमध्ये संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख, संपर्क प्रमुख हरिशचंद्र तोडकर, हमीद शेख, सचिन वाघमारे, परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष इम्रानभाई शेख आदी सहभागी होते.

  • तत्पूर्वी शनिवार (दि.८) अपना वतन संघटनेच्या वतीने मुंबई येथील काँग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष यांच्या पक्ष कार्यालयास भेट देऊन कलम ३५३ रद्द करणेबाबत चा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडणेबाबत सर्वपक्षीय आमदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळेस राष्टवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते धनंजय यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून त्याबाबत आम्ही विधिमंडळात नकीच मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन दिले.

अपना वतन संघटनेच्या वतीने ३५३ कलमाच्या गैरवापराबाबत जनजागृती करण्यात येत असून लवकरच त्याबाबत शहरातील सर्व सामाजिक संघटनांकडून कलाम ३५३ रद्द करणेसाठी किंवा त्यामध्ये सुधारणा करणेसाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.