Pimpri: महिला कर्मचाऱ्याचा छळ करणाऱ्या जनता संपर्क अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवा; नगरसेविकांची मागणी

Send a public relations officer who is harassing a female employee on compulsory leave; Demand of corporators

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेचे जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्यामुळे गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांनी केली आहे.

याबाबत नगरसेविका सावळे आणि शेंडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, किरण गायकवाड वैयक्तिकरित्या आपली जाणीवपूर्वक छळवणूक करत असून विविध मार्गाने मानसिक त्रास देत असल्याचे ‘त्या’ महिला कर्मचाऱ्याने तक्रार अर्जात म्हटले आहे.

ते सातत्याने अपमान करतात. एकेरी उल्लेख करतात, अर्वाच्च भाषा वापरतात, नियमबाह्य्य कामे सांगतात, मी सांगेन तसे न वागल्यास कारवाई करेन, अशी वारंवार धमकी देतात.

कार्यालयीन कामाव्यतिरिक्त “व्हॉट्स ॲप” ला संदेश पाठवत राहतात. त्यांचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला आहे. गायकवाड यांच्याकडून आपल्याला प्रचंड त्रास होत आहे”, असा मजकूर तरुणीच्या तक्रार अर्जात नमूद आहे.

तसेच गायकवाड यांच्याकडून होत असलेल्या त्रासामुळे माझ्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे देखील या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे, असे नगरसेविकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, मानसिक त्रास देऊन आत्महत्येस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यामुळे गायकवाड यांना महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते. ते प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गायकवाड यांना नुकतेच पुन्हा महापालिका सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे.

निलंबनानंतर पुन्हा रुजू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात गायकवाड यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार आली आहे. सदर महिला कर्मचाऱ्याने 21 मे 2020 रोजी म्हणजेच सुमारे एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार केली असताना प्रशासनाकडून तातडीने चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला बालकल्याण विभागाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) कडे देखील सदर तक्रार करण्यात आलेली आहे.

परंतु, आजतागायत या तक्रार अर्जावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही, हि बाब अत्यंत संतापजनक आहे. वस्तुत: कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल तातडीने घेणे गरजेचे होते.

मात्र, तसे होताना दिसत नाही. सदर महिला कर्मचारीने यापूर्वी अतिरिक्त आयुक्तांकडे सदर त्रासाबद्दल तोंडी तक्रार केली होती, परंतु दुर्दैवाने तिने केलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली नाही.

उलट किरण गायकवाड यांनी त्या महिला कर्मचाऱ्याला धमकावले. “मीच बॉस आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, तुला जायचयं तिकडे जा, ” असे दमदाटीवजा शब्द किरण गायकवाड यांनी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीमध्ये किरण गायकवाड हे कार्यालयीन कामाव्यतिरिक्त त्या महिला कर्मचाऱ्याला “व्हॉट्सअप” ला संदेश पाठवत राहतात व तिने त्यांचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला आहे, अशा गंभीर स्वरूपाची बाब उल्लेखित आहे. सदर बाब फौजदारी स्वरूपा गुन्हा आहे.

त्यामुळे चौकशी होईपर्यंत किरण गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे. चौकशी अंती दोषी आढळल्यास त्यांना पालिका सेवेतून बडतर्फ करावे. गायकवाड यांच्या विरोधात प्रशासनाकडे प्राप्त तक्रारीची व विशाखा समितीकडे दाखल असलेल्या तक्रारीची देखील सखोल चौकशी करावी.

अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात महिलांचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. कारवाई केली नाहीच तर, प्रसंगी आंदोलन करू, याची दखल घ्यावी, असा इशाराही त्यांना दिला आहे.

याबाबत जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, ”तक्रार देणारी महिला कामात टाळाटाळ आणि कर्तव्यात कसूर करत आहे. वरिष्ठांशी अरेरावीची भाषा, उद्धट वर्तन केले जाते. त्यामुळे त्यांना नोटीस दिली होती. त्यामुळे सुडबुद्धीने माझ्या विरोधात तक्रार दिली आहे”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.