Pimpri : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले. राष्ट्रपती कार्यालयाकडून आज संपूर्ण देशभरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिका-यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचे नाव आहे.

गोंदिया, भंडारा, परभणी, नांदेड, लातूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून राष्ट्रपती पदकासाठी त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव केला जातो. पोलीस महासंचालक याबाबतचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवतात, त्यानंतर राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठवितात. अधिका-यांनी केलेल्या कामगिरीच्या समीक्षेनंतर राष्ट्रपती पदकांची यादी जाहिर करण्यात येते. पदक वितरण सोहळ्याची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. लवकरच ही तारीख जाहीर होणार आहे.

विठ्ठल कुबडे म्हणाले, पोलीस खात्यात काम करत असताना अनेक जबाबदाऱ्या सांभाळत काम करावे लागते. अनेकदा जीवघेण्या प्रसंगांना देखील सामोरं जावं लागतं. पण अशा पदकांमधून जेंव्हा कामाचा गौरव होतो, तेंव्हा काम करण्याची उर्मी आणखीन वाढते. माझ्या आजवरच्या कामगिरीत माझ्या सहका-यांचे देखील योगदान आहे. त्यामुळे हा सन्मान माझ्यासह माझ्या सर्व सहका-यांचा देखील आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहका-यांची साथ, आई-वडिलांचे आशीर्वाद, पत्नी आणि मुलांचे प्रोत्साहन यामुळे हा सन्मान मिळवता आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल खंडूजी कुबडे यांच्याबाबत –

महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथील प्रशिक्षणानंतर 15 सप्टेंबर 1993 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पहिली पोस्टींग भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे झाली. त्यानंतर अतिनक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणा-या गोरेगाव, सालेकसा, दरेकसा, अर्जुनी मोरगाव यांसारख्या भागात काम केले. भंडारा येथे 1994 ते 2000 पर्यंत पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केले. दरम्यान, नक्षलवाद्यांशी झालेल्या दोन चकमकींमध्ये दोन नक्षलवाद्यांना पकडले, तर चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

परभणी जिल्ह्यात काही काळ काम केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात बदली झाली. नांदेड जिल्ह्यात 2000 ते 2004 पर्यंत काम केले. यावेळी उस्माननगर, कुंडलवाडी येथे प्रभारी म्हणून काम पहिले. उस्माननगर, कुंडलवाडी या पोलीस ठाण्यांना चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. २००४ मध्ये पोलीस उपनिरीक्षक वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बुलढाणा येथे बढती मिळाली. 2007 पर्यंत काम करत असताना नकली नोटा आणि हत्यारे पकडल्याची कारवाई चांगलीच गाजली. याबद्दल पोलीस प्रशासनाकडून सन्मानित करण्यात आले.

2007 ते 2015 या कालावधित लातूर येथे काम केले. तिथली सेवा देखील समाधानकारक झाली असून त्याबाबत सन्मानित करण्यात आले. 15 जून 2015 रोजी पुणे पोलीस आयुक्तालयात पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू. त्यानंतर चिचंवड येथे गुन्हे तपासात विशेष कामगिरी केल्याबद्दल 13 वेळा पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजवर कुबडे यांना 869 रिवार्ड आणि विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, आंतरिक सुरक्षा पदक मिळाले आहे. यानंतर 15 आॅगस्ट 2018 रोजी राष्ट्रपती पदकासाठी निवड.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.