Pimpri : संचारबंदीतही टोळक्याची दादागिरी; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ड्रम नेल्याच्या किरकोळ कारणावरून सात जणांनी  एकावर कोयत्याने वार केले. तसेच एका दुचाकीचे नुकसान केले. संचारबंदी सुरू असतानाही टोळक्याने अशा प्रकारे दादागिरी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (दि. 12) पहाटे दोनच्या सुमारास बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.

छोटा रावण (वय 25), चांद (वय 22), ए जे (वय 22) आणि त्यांचे तीन ते चार साथीदार, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल अभिमन्यु सोनवणे (वय 30, रा. बौद्धनगर, एमआयडीसी पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छोटा रावण याने फिर्यादी यांचा ड्रम नेला. याबाबत फिर्यादी यांनी त्याला विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या साथीदारांसह बेकायदा जमाव जमवून फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने मारून जखमी केले.

तसेच फिर्यादी यांच्या घराजवळ असलेल्या मोटारसायकलची तोडफोड केली. ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणी घराच्या बाहेर आला तर त्याला खल्लास करून टाकीन’ अशी आरोपींनी धमकी देत दादागिरी केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.