Pimpri: पालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

Seventh pay commission applied to the primary teachers of the municipality; कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी गोड बातमी आहे. पालिकेच्या 1 हजार 39 शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) मान्यता दिली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देण्याच्या पिंपरी चिंचवड कर्मचारी  महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे, खजिनदार अविनाश ढमाले यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. परंतु, पालिकेच्या 1 हजार 39 शिक्षकांना आयोग लागू झाला नव्हता. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगानूसार वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली होती. राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीही दोन दिवसांपूर्वी आयुक्तांना आयोग लागू करण्याबाबत सूचना केली होती.

त्यानंतर आज आयुक्त हर्डीकर यांनी प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा आदेश काढला आहे. त्याचा 1 हजार 39 शिक्षकांना लाभ होणार आहे. यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुधारित वेतनश्रेणीत वेतननिश्चिती व वेतन अदा करणे, सुधारित दराने निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन, सेवा उपदान इत्यादी थकबाकी रक्कम अदा करण्याबाबत संगणक प्रणाली तयार करावी. त्याबाबतचे युजर मॅन्युअलही उपलब्ध करुन द्यावे.

सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन व भत्ते अदा करताना सरकारच्या निर्णयाच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. हे विहित मुदतीत करावे याबाबतची माहिती आयुक्तांनी आदेशात दिली आहे.

कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे म्हणाल्या, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेने कर्मचा-यांसाठी घेतलेला निर्णय अतिशय उपयुक्त आहे. यामधील काही त्रुटीसंदर्भात आगामी काळात राज्य शासनाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

शिक्षकांना सात वेतन आयोग लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, नगरसेवकांनी सहकार्य केले. या निर्णयामुळे पालिका शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेतन आयोग लागू होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले. त्या सर्वांचे कर्मचारी महासंघाच्या वतीने शतशः आभार मानतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.