Pimpri: सांडपाणी प्रक्रीयेबाबत कृती आराखडा सादर करा, प्रदूषण महामंडळाची महापालिकेला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने विनाप्रक्रीया सांडपाणी नदीत सोडणे तातडीने थांबवावे. तसेच सांडपाणी प्रक्रीयेबाबत कृती आराखडा सादर करावा, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबतची माहिती माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

डिसेंबर महिन्यात थेरगाव केजूबाई बंधारा येथे मोठ्या प्रमाणावर मासे मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिक राहुल सरोदे यांनी केल्यावर एमपीसीबी अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ताथवडे स्मशानभूमीजवळील नदीपात्रात कासव मृतावस्थेत आढळले. पवना नदीत चार ठिकाणांहून विनाप्रक्रीया केलेले सांडपाणी मिसळत असल्याचे दिसले.

महापालिका सांडपाण्यावर योग्य प्रक्रीया करत नसल्याने नदीतील मासे मरण्याचे प्रकार वर्षातून दोनदा झाल्याचे निदर्शनास आले. रावेत मैलाशुद्धीकरण केंद्राची अवस्था बिकट आढळली. देखभाल दुरूस्तीचा अभाव जाणवला. प्रक्रीया केलेले सांडपाणी गढूळ, हिरवट रंगाचे आढळले. या सर्व तपशीलांचा, निरीक्षणांचा विचार करता एमपीसीबीने महापालिकेला पाणी (प्रतिबंध प्रदूषण नियंत्रण) कायदा 1974 नुसार, महापालिकेला नोटीस दिली आहे.

महापालिकने नियमांचे उल्लंघन केले आहे. जलचर प्राण्यांची जिवीतहानी पाहता पर्यावरणास हानी पोहोचवली असल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. वीज मंडळाला आदेश देऊन वीजपुरवठा तर पाटबंधारे विभागाला आदेश देऊन पाणीपुरठा खंडीत करण्यास का बजावू नये ?, महापालिकेच्या विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये ? अशी थेट विचारणा केली आहे. महापालिकेने विनाप्रक्रीया केलेले पाणी पवना नदीत सोडणे तातडीने थांबवावे. नदीप्रदूषण रोखण्याबाबतचा कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे आदेशही एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहेत.याबाबतची माहिती माजी खासदार गजानन बाबर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.