Pimpri : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणास अटक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आंतरजातीय विवाहास घरचे मान्यता देणार नसल्याचे कारण पुढे करत त्याने तरुणीशी फारकत घेतली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार 13 एप्रिल ते 8 सप्टेंबर 2019 या कालावधीत वल्लभनगर पिंपरी येथे घडला.

निखिल अशोक जगताप (वय 23, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे एकाच कंपनीमध्ये नोकरी करीत होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ‘माझ्या घरचे आंतरजातीय विवाह करण्यास तयार होणार नाहीत. तू तुझे बघ. आपला विषय संपला’, असे त्याने फिर्यादीला सांगितले.

फिर्यादीने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘माझ्या घरच्या लोकांच्या पुढे जाऊ शकत नाही’, असे म्हणत आरोपीने फिर्यादी तरुणीला हाताने मारहाण केली. लग्नाचा विषय सोडवू, असा बहाणा करून आरोपीने फिर्यादीला चिंचवड स्टेशन येथील एका लॉजवर नेऊन पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत तरुणावर गुन्हा नोंदवला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.