Pimpri : नाते सुदृढ होण्यासाठी जोडीदाराचा विचार करणे गरजेचे- अध्यात्मिक गुरु शंतनु जोशी

एमपीसी न्यूज- नाते सुदृढ होण्यासाठी आणि अधिक खुलण्यासाठी आपल्या प्रत्येक नात्यामधील जोडीदाराचा देखील विचार करणे आवश्यक आहे असे मत अध्यात्मिक गुरु शंतनु जोशी यांनी व्यक्त केले. पिंपरीच्या एएसएम कॉलेजमध्ये रविवारी (दि. 16) फॉग लॅम्प मिशन सेशन्स तर्फे ‘सिम्प्लिफाय रिलेशनशिप्स’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शंतनू जोशी म्हणाले, ” नात्यामध्ये असलेल्या दोन्ही व्यक्ती आणि प्रत्यक्ष नाते असे तिन्ही मिळून नातेसंबंध निर्माण होतो. स्वार्थ, भीती, गैरसमज इत्यादींमुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होऊ शकतो. हा ताण टाळण्यासाठी, नाते सुदृढ होण्यासाठी आणि अधिक खुलण्यासाठी आपल्या प्रत्येक नात्यामधील जोडीदाराचा देखील विचार करणे आवश्यक आहे. आपल्या व त्या व्यक्तीच्या संकल्पना, संज्ञा, पसंती, अपेक्षा या भिन्न असू शकतात. त्या जाणून घेऊन संवाद साधायला हवा व त्या दृष्टीने योग्य मार्गाने नात्यांची वाटचाल व्हायला हवी” असे शंतनू जोशी म्हणाले.

आपल्याला जेव्हा समोरच्या व्यक्तीला काही द्यायचे असते तेव्हा ते प्रथम आपल्याकडे असायला हवे, आपण आनंदी असल्याखेरीज नाते सुदृढ होऊ शकत नाही. त्यामुळे नाते खुलवण्याकरिता दिवसातील काही वेळ आपण आपले छंद जोपासण्यासाठी व ध्यानासाठी काढणे हे गरजेचे आहे असा संदेश शंतनु जोशी यांनी दिला.

या कार्यक्रमाची सांगता सामूहिक ध्यानाने झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.