Pimpri : शास्तीकर बाधितांचा मोर्चा धडकला महापालिकेवर ; शास्तीकर नोटिसांची केली होळी

एमपीसी न्यूज – अवैध बांधकामावरील शास्तीकर रद्द करावा या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड नागरी कृती समितीच्या वतीने शास्तीकर बाधितांचा मोर्चा पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडकला. या ठिकाणी शास्तीकर नोटिसांची होळी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेत उपस्थित सर्व आंदोलक नेत्यांनी शास्तीकर रद्द करण्याची मागणी केली.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, “शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतवा देण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. केवळ गोड बोलून वेळ मारून नेत आहेत. नागरिकांना 80 ते 85 लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत. नागरिकांनी एवढा दंड कोठून भरायचा ? दोन-दोन गुंठे जागा घेऊन घर बांधलेल्या नागिरकांनी काय करायचे?”असा सवालही त्यांनी केला. सत्ताधारी भाजप लोकमतचा आदर करत नाही. जनतेच्या भावनांचा विचार केला जात नाही. आता निवडणूक जवळ आल्याने नोटीसा देणे बंद करतील. अधिकारी येणार नाहीत. निवडणूक झाल्यावर पुन्हा कारवाई करतील. त्यामुळे सजग राहून आंदोलन तीव्र करायचे आहे, असेही लांडे म्हणाले.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, “शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोन, प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडे बारा टक्के परतवा देण्याचे आमिष सत्ताधाऱ्यांनी दाखविले. मते घेऊन खासदार, आमदार झाले. परंतु, साडेचार वर्ष झोपेचे सोंग घेतले. कुंभकर्ण सारखे झोपले आहेत. या झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी मोर्चा काढला आहे. शास्तीकराच्या नावावर खंडणी वसूल केली जात आहे. जिझिया शास्तीकर, मिळकत कर भरू नका, मालमत्तेला टाळे लावण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना ठोकून काढा. शास्तीकर जोपर्यंत माफ होत नाही. तोपर्यंत लढा द्यायचा आहे ” आमदाराच्या घरावर मोर्चा काढा असे आवाहन बाधितांना करत साने म्हणाले, “रेडझोन बाधितांना सुविधा देत नाहीत. त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे. आता निवडणूक आल्यावर आमदार जनतेचा कळवळा दाखवित आहेत”

संदीप बेलसरे म्हणाले, “अन्यायकारक पध्दतीने जिझिया शास्तीकर लादला आहे. लघुउद्योजकांना 80 ते 85 लाख रुपयांच्या दंडाच्या नोटिसा दिल्या आहेत. अधिकारी धमकावत, दमबाजी करत आहेत. बांधकामे पडण्याची धमकी देत आहेत.शास्तीकराचा प्रश्न त्वरित मार्गी लावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल”

मनसेचे सचिन चिखले म्हणाले, “भाजप सरकारने साडेचार वर्ष भुलवत ठेवले आहे. सरसकट शास्तीकर माफ झाला पाहिजे. तोपर्यंत लढा देऊ, त्यासाठी मुंबईपर्यंत मोर्चा काढला जाईल”

मारुती भापकर म्हणाले, “आठ वर्षांपासून शास्तीकर लागू आहे. गेली अनेक वर्ष आम्ही आंदोलन करत आहोत. आताचे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे नेते आंदोलनात सहभागी होत होते. आम्हाला सत्ता द्या 100 दिवसांत शास्तीकर, अनधिकृत बांधकाम, साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतु, सत्ता जायची वेळ आली तरी यांनी प्रश्न मार्गी लावला नाही. केवळ 600 स्केवर फुटांचे गाजर दाखविले जात आहे. खोटी आश्वासने देत आहेत”

तत्पूर्वी आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. काळभोरनगर, चिंचवड, मोरवाडीमार्गे मोर्चा महापालिकेवर धडकला. या मोर्चामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, विनया तापकीर, नगरसेवक मयूर कलाटे, नाना काटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सचिन चिखले, संजय वाबळे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, धनंजय भालेकर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मानव कांबळे, रिंगरोड, रेडझोनचे पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी महापौर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर शास्तीबाधित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘रद्द करा….रद्द करा….झिजिया कर रद्द करा’…’शास्तीकर रद्द झालाच पाहिजे’….’अनियमीत घरे नियमित झाली पाहिजेत’..’घर आमच्या हक्काचे….नाही कोणाच्या बापाचे’….’कालबाह्य झालेला रिंग रोड रद्द झालाच पाहिजे’, ‘अनधिकृत प्रश्नाचे काय झाले?’, …असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते.
मोर्चा महापालिकेवर धडकताच शास्तीकराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शास्तीकर नोटिसांची केली होळी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.