Pimpri : ‘शास्तीकर माफी’ हे निवडणुकांच्या तोंडावर देण्यात आलेले ‘गाजर’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांची टीका

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एका कार्यक्रमात शास्तीकर माफीचा निर्णय येत्या १५ दिवसांत घेणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले होते. परंतू नेहमीप्रमाणे त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे “शास्तीकर माफी” हे निवडणुकांच्या तोंडावर देण्यात आलेले गाजर आहे, अशी टिका पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणा-या शास्तीकरामुळे शहरातील जनतेचे कंबरडे माेडले गेले आहे. यातून मुक्तता झाल्यास जनतेला दिलासा मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही मात्र शास्तीकर माफीचा निर्णय न झाल्याने शास्तीकर माफीचे निव्वळ ‘गाजर’ दाखवले जात असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीचे आश्‍वासन सलग तिसर्‍यांदा दिले आहे. सत्ताधारी हे या महत्वपुर्ण बाबीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. यामुळे शहरवासीयांचा अपेक्षाभंग झाला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांना लागू करण्यात आलेल्या शास्तीकरामुळे जनता चिंतीत आहे. त्यामुळे शहरातील बांधकामांना लागू असलेला शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे अध्यादेश सरकारने काढणे गरजेचे आहे.

  • सत्ताधारी भाजप ठरले निष्क्रीय
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी शास्तीकर माफीचा निर्णय कागदावरच राहिला आहे. भाजपाने शास्तीकर माफीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना गाजर दिले आहे. भाजपने केंद्रात, राज्यात तसेच महापालिकेत सत्ता हस्तगत करून देखील भाजप सरकार नागरी समस्यांबाबत उदासीन आहे. यामुळे सत्ताधारी भाजप निष्क्रीय ठरले असून त्यांना आपले अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव राहिलेली नाही.तसेच शंभर टक्के शास्तीकर माफी कधी होणार? असा प्रश्न अमित बच्छाव यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.