Pimpri : विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ यांचा पक्षाकडे अर्ज

ओव्हाळ प्रबळ दावेदार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचा अर्ज माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी पक्षाकडे दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे ओव्हाळ यांनी आपला अर्ज दिला आहे. दरम्यान, ओव्हाळ यांनी मागील एक वर्षापासून विधानसभेची तयारी सुरु केली असून ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

विधानसभा निवडणूक तीन महिन्यावर आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते.1 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल करावयाचे होते. पिंपरी मतदारसंघातून शेखर ओव्हाळ यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैंकी पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मांदियाळी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताथवडे, पुनावळे प्रभागातून शेखर ओव्हाळ 2012 च्या निवडणुकीत निवडून आले होते. महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित घरवापसी केली. त्याचा बारामतीच्या उमेदवाराला फायदा देखील झाला. पिंपरीतून विधानसभा लढविण्याची ओव्हाळ यांनी एक वर्षापासून तयारी सुरु केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ‘फ्रेश’ चेह-यांना संधी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी मतदारसंघातून शेखर ओव्हाळ यांची दावेदारी वाढली आहे.

ओव्हाळ यांच्याबरोबरच माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका सुलक्षणा धर-शिलवंत, नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवर गोरक्ष लोखंडे हे पिंपरीतून इच्छूक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.