Pimpri: सफाई कार्मचारी महिला भगिनींना कामगार नेते इरफान सय्यद यांच्याकडून अनोखी ओवाळणी

लोकांनी टाकलेला ओला-सुका कचरा विलगीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा लागतो. महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सफाई कर्मचारी महिला संपूर्ण शहरात स्वच्छतेचे काम करतात. त्यांच्यामुळेच खरे तर शहरातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहते. अशी भावना व्यक्त करत रक्षाबंधन सणानिमित्त कामगार नेते तथा शिवसेना सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद यांनी संबंध सफाई कर्मचारी महिला भगिनींना ‘आरोग्य सुरक्षा संच’ भेट दिला आहे.

सफाई कर्मचारी महिला वर्गाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आवश्यक तेवढे स्वच्छतेचे साहित्य दिले जात नसल्याच्या वारंवार तक्रारी असतात. कोरोना परिस्थितीचा अपवाद वगळता त्यांना मास्क दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत महिला सफाई कामगारांना शहरातील विविध भागात जाऊन रस्ते सफाई काम करावे लागते.

लोकांनी टाकलेला ओला-सुका कचरा विलगीकृत करून घंटागाडीमध्ये टाकावा लागतो. महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार केला जात नाही. कोरोनाच्या धोकादायक परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगार आपले कर्तव्य बजावतात. त्यांच्या कार्याबद्दल कामगार नेते इरफान सय्यद यांनी आदरभाव व्यक्त केला आहे.

‘’सावित्रीची लेक तू… आत्मसन्मानाची ज्योत… हाती घेवून अडथळ्यांना लाथाडून… सदैव पुढे जा तू…!’’ अशा शब्दांत सय्यद यांनी सफाई कामगार महिलांप्रती बंधुभावाची भावना व्यक्त केली आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांनी महिला भगिनींना ‘आरोग्य सुरक्षा संच’ भेट दिला.

रक्षाबंधन सणाची ही एकप्रकारची ओवाळणीच इरफान सय्यद यांनी महिला भगिनींना दिली आहे. आपला भाऊ पाठीशी असल्याने महिला भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.