Pimpri : महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवप्रतिमा, शिवमुद्रा व जागविख्यातांचे शिवोद्गार लावा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजीमहाराज यांची प्रतिमा, शिवमुद्रा आणि जागतिक स्तरावरील व्यक्तींचे शिवाजी महाराजांबद्दल उदगार वाक्य कायमस्वरूपी लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापौर उषा ढोरे यांना दिले.

महापालिकेच्या प्रवेशद्वार, महापालिका सभागृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा कोनशिला लावण्याची मागणी 2007 ते 2012 या कालावधीत करण्यात आली. ती मागणी तत्कालीन महापौरांनी तात्काळ मान्य करून तिन्ही ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनेची कोनशिला लावली. त्यानंतर, 17 मार्च 2012 रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शिवमुद्रा आणि जागतिक स्तरावरील व्यक्तींचे शिवाजी महाराजांबद्दल उदगार वाक्य लावण्याची मागणी केली. या मागणीचा प्रस्ताव तत्कालीन महापौरांनी 29 मार्च 2012 रोजी योग्य कार्यवाहीसाठी तत्कालीन आयुक्तांकडे पाठवला. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

त्यानंतर, 2017 मध्ये माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देखील हीच मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीकडे सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाने कानाडोळा केला आहे. ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ’ अशी घोषणा देऊन भाजपने महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवप्रेमींची मते घेतली.

2017च्या महापालिका निवडणुकीनंतर आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांनी सर्व नगरसेवकांना शिवनेरी किल्ल्यावर नेऊन शिवप्रभुंची शपथ दिली. त्यामुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवछत्रपतींची प्रतिमा, शिवमुद्रा आणि जागतिक स्तरावरील व्यक्तींचे शिवाजी महाराजांबद्दल उदगार वाक्य लावावे. असे मारुती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेत माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या इमारतीमधील तळमजल्यावर दर्शनी भागात हे तैलचित्र लावण्यात येणार आहे. याचे अनावरण बुधवारी (दि. 25) करण्यात येणार आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कामाचा महापालिकेने गौरव केला आहे, असे मारुती भापकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.