Pimpri : युतीमुळे विधानसभेची समीकरणे बदलणार ?

युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी भाजप तर चिंचवड, भोसरी शिवसेनेकडे

(गणेश यादव )

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती झाली आहे. त्यामुळे पिंपरी,चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील समीकरणे बदलणार आहेत. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी मतदार संघ भाजप तर चिंचवड आणि भोसरी शिवसेनेकडे आहेत. सध्या पिंपरीत शिवसेनेचा आमदार आहे. तर, चिंचवडला भाजपचा अन्‌ भोसरीत भाजपसहयोगी आमदार आहेत. आगामी विधानसभेला युतीमुळे समीकरणे बदलणार असून कोणत्या पक्षाला कोणती जागा सोडली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला दोन जागांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना-भाजपने 2014 ची लोकसभा निवडणूक एकत्रित लढविली होती. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांनी झालेली विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढविली. आता आगामी 2019 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाची युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. मित्रपक्षांच्या जागा सोडून उर्वरित जागा दोन्ही पक्ष ‘फिफ्टी-फिफ्टी’ लढविणार आहेत.

शिवसेना-भाजप 2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढल्याने तीनही मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. . पिंपरी मतदार संघातून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. तर, चिंचवड मतदार संघातून भाजपचे लक्ष्मण जगताप निवडून आले. भोसरीतून अपक्ष महेश लांडगे निवडून आले. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या २००९ च्या लढविलेल्या फॉर्म्युल्यानुसार पिंपरी मतदार संघ भाजप तर चिंचवड आणि भोसरी शिवसेनेकडे होता. . परंतु, 2014 च्या निवडणुकीतील बदललेल्या समीकरणामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलला जातो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पिंपरी मतदार संघ भाजपने मित्रपक्ष आरपीआयला दिला आहे. आगामी निवडणुकीत देखील मित्रपक्ष म्हणून आरपीआयला पिंपरी मतदार संघ देणार का? आरपीआयला मतदार संघ सोडल्यास शिवसेनेच्या विद्यमान आमदारांचे काय करणार? हे महत्वाचे आहे.

युतीच्या फॉर्म्युल्यानुसार चिंचवड, भोसरी मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. पण आता चिंचवडचे आमदार भाजपचे आहेत. तर, भोसरीचे आमदार सहयोगी आहेत. चिंचवड किंवा भोसरी दोन्हीपैकी एक मतदार संघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे. त्यामुळे भाजपला एका मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे. चिंचवड की भोसरी मतदार संघावर भाजप पाणी सोडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.