Pimpri shivsena News: ‘सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं’ ?;  शिवसेनेचे पालिकेसमोर आंदोलन

शिवसेनेने दान घेतलेल्या मुर्त्या विसर्जनासाठी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोना परिस्थितीची जाणीव असतानाही गणेश विसर्जनाची कोणतीही सोय केली नाही. पालिकेच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात शिवसेनेने आज (सोमवारी) पालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले.

विसर्जन घाट व  पूर्वीचे महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले. शहरात फिरत्या हौंदाची कोठेही व्यवस्था केली नाही. मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन, यामुळे सांगा गणपतीचे विसर्जन कुठे करायचं असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला.

 

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विश्वजित बारणे, सरिता साने, अजित तुतारे, संतोष सौंदणकर, बाळासाहेब वाल्हेकर, अभिजीत गोफण, हरेश नखाते, ज्ञानेश्वर शिंदे, शर्वरी जळमकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ”कोरोना संकट  असतानाही पालिकेने गणेशोत्सवाचे नियोजन केले नाही. पालिका प्रशासनाकडून अतिशय गलथान कारभार सुरु आहे.

पालिकेने विसर्जन घाट पत्रे लावून बंद केले आहेत. शहरात फिरत्या हौंदाची कोठेही व्यवस्था नाही. पालिकेने गणेशोत्सावकडे अक्षम्य पद्धतीने दुर्लक्ष केले. उत्सवाचे कसलेही नियोजन केले नाही.

दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मूर्तिदान उपक्रमाचे ढिसाळ नियोजन तसेच स्वयंसेवी संस्था पालिकेसोबत जोडल्या असतील तर त्यांची प्रभागनिहाय माहिती प्रशासनाच्या जबाबदार अधिकार्‍यांना देखील नाही.

नियोजनाचा संपूर्ण अभाव आहे. पालिका गणेशभक्तांच्या भावनांशी खेळत आहे’, असा आरोप चिंचवडे यांनी केला.

शिवसेनेने दान घेतलेल्या मुर्त्या विसर्जनासाठी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या.

आज संध्याकाळपर्यंत मुर्तीदानाबाबत प्रभागनिहाय पालिकेचे नियोजन व अधिकारी वर्गाच्या जबाबदार्‍या जाहीर करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याचे, चिंचवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.