Pimpri : महापालिकेच्या चुकीमुळे 36 हजार विद्यार्थी बुटापासून वंचित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने महापालिका शाळेतील 36 हजार विद्यार्थी बुटापासून वंचित राहिले आहेत. तरतूद नसल्याने बुटाचे वाटप केले नाही. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना बुट वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागाच्या 105 प्राथमिक शाळा आहेत. तर, माध्यमिक 18 शाळा आहेत. शाळांमध्ये सुमारे 38 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप केले जाते. तसेच बुटाचे देखील वाटप केले जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले जाते. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. महापालिकेच्या दुर्लक्षाने विद्यार्थी बुटापासून वंचित राहिले आहेत. केवळ बुटासाठी तरतूद नसल्याने विद्यार्थ्यांना बुटापासून वंचित रहावे लागले.

दरम्यान, महापालिकेने बुटाचा पुरवठा करणा-या कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिली होती. परंतु, ती रद्द केली असल्याचा कंत्राटदाराचा दावा आहे. याबाबत कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत बोलताना शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे म्हणाले, ”या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बुट वाटप झाले नाही. त्यासाठी तरतूद नव्हती. त्यामुळे ठेकेदाराला पुरवठा आदेश दिला नव्हता. तरतूद उपलब्ध झाल्यास पुरवठा आदेश देण्यात येईल, असे ठेकेदाराला सांगितले होते. याबाबत स्थायी समितीसमोर प्रशासकीय प्रस्ताव ठेवला होता. परंतु, स्थायीला मान्य झाला नाही”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.