Pimpri : बनावट कागदपत्रांद्वारे खरेदी केलेली सिमकार्ड ठरताहेत पोलिसांची डोकेदुखी

एमपीसी न्यूज – मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांच्या कागदपत्रांची कोणतीही सत्यता पडताळल्याशिवाय सिमकार्डची विक्री केली जाते. यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी करून त्याचा गुन्हे करण्यासाठी उपयोग केल्याच्या घटना घडत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेतले असल्याने संबंधित गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांची डोकेदुखी वाढते.

पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करताना आरोपीच्या मोबाईलचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यातील सिमकार्डची माहिती मिळवून ख-या आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता येते. पण सध्या बनावट कागदपत्रे वापरून गुन्हेगारांकडून सिमकार्ड घेऊन त्याआधारे संपर्क केल्याचे उघडकीस येत आहे. यामुळे गुन्हेगारांची माहिती असूनही त्याच्या मूळ पत्त्यापर्यंत अथवा त्याच्या मूळ ओळखीपर्यंत पोलिसांना पोहोचता येत नाही.

पिंपरीमधील संत तुकाराम नगर येथे एका दांपत्याने तीन जणांना गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. आरोपी दांपत्य त्या घरात नोकर म्हणून आले होते. त्यांनी सुमारे 70 ते 80 सिमकार्ड वापरले असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यात महत्वाची बाब ही की त्यांनी घेतलेली सिमकार्ड बनावट कागदपत्रे देऊन खरेदी केल्याचे आढळून आले आहे.

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात चिंचवड मधील अमोल काळे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कोठडीत आहे. अमोल काळे चिंचवड येथील रहिवासी आहे. कर्नाटक, बंगळूरु येथील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चिंचवडमधून त्याला 31 मे रोजी विशेष तपास पथकाने ताब्यात घेतले. त्याचे कुटुंब एका हिंदुत्वादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. कर्नाटक पोलिसांनी केलेल्या चौकशीत काळे याच्याकडे 74 सिमकार्ड आणि 22 मोबाइल फोन आढळून आलेले आहेत.

साधारणपणे एखाद्या व्यक्तिला संपर्कासाठी एक ते दोन सिमकार्ड पुरेशी आहेत. तिसरे सिमकार्ड आले, तर आधी असलेल्या दोनपैकी एखादे सिम बंद राहते, अशी अवस्था सर्वसामान्य माणसाची होते. अशात मोठ्या प्रमाणात सिमकार्ड आढळून येणे, ही संशयास्पद बाब आहे.

जगभरात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईल अत्यंत महत्वाचे संपर्क साधन म्हणून ओळखले जाते. मोबाईल आजच्या मानवाची जगण्याची मूलभूत गरज बनली आहे. त्या मोबाईलची मूलभूत गरज सिमकार्ड आहे. सिमकार्डशिवाय मोबाईल फोन म्हणजे केवळ एक डब्बा आहे. मोबाईल फोनवरून होणा-या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांना लक्ष ठेवणे सोयीचे जाते. एखाद्या मोबाईल फोनवरून संशयास्पद हालचाल झाल्यास तात्काळ मोबाईल मधील सिमकार्डधारकाचा तपशील पाहून मूळ मालकापर्यंत पोहोचता येते. पण हेच सिमकार्ड खरेदी करण्यासाठी चुकीची माहिती आणि कागदपत्रे दिली असतील तर यामुळे गुन्हेगारीेस चालना मिळते.

मोबाईल कंपन्यांनी सिमकार्डची विक्री करताना ग्राहकाची कागदपत्रे खरी आहेत का? याची चौकशी करायला हवी. ग्राहकाने दिलेल्या कागदपत्रांवर असलेल्या पत्त्यावर जाऊन त्याची चौकशी आणि फोटोची सत्यता पडताळायला हवी. सत्यता पडताळल्यानंतरच सिमकार्ड सुरु करावे. त्यामुळे या बनावटगिरीला आळा बसेल.

पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर म्हणाले, “मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची सत्यता पडताळल्याशिवाय सिमकार्डची सेवा सुरु करू नये. तसेच दुस-यांचे सिमकार्ड वापरण्याचे प्रकारही समोर येत आहेत. दुस-यांचे सिमकार्ड वापरून गुन्हे केले जातात. तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये वापरलेले सिमकार्ड इतरांना वापरण्यास दिले जाते. त्यामुळे सिमकार्ड वापरणारा चूक नसली तरी गुन्हेगार ठरू शकतो. बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले सिमकार्ड वापरून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील होत आहेत. असे प्रकार समोर येताच पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.