Pimpri: विधानसभेला राष्ट्रवादीत चिंचवडमधून सहा, पिंपरीत पाच अन्‌ भोसरीतून तिघे इच्छुक

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवडमध्ये सहा, पिंपरीत पाच आणि भोसरीतून तिघांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामध्ये चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, राजेंद्र जगताप, पिंपरीतून अण्णा बनसोडे, सुलक्षणा धर, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे आणि भोसरीतून विलास लांडे, दत्ता साने, पंडित गवळी यांचा समावेश आहे.

दरम्यान, आठ दिवसात मतदारसंघात येऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतरच उमेदवार जाहीर केले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शहरातील तीनही मतदारसंघाचा आज (शनिवारी) मुंबईत आढावा घेतला. इच्छुकांचा अंदाज घेतला. विधानसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पार्थ पवार उपस्थित होते. शहरातून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या असतात. प्रश्न वेगळे असतात. विधानसभेला ताकदीने लढा द्यायचा आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा. जनतेत मिसळा. त्यांच्या प्रश्वांवर आवाज उठविला पाहिजे. आपली सत्ता असताना झालेली कामे पोहचविण्यात का कमी पडतो याचे आत्मपरिक्षण केले पाहिजे.

  • महापालिका विभागून घेतली आहे. हे अधिकारी सांगतात. महापालिकेत जे चालले आहे. ते लोकांना मान्य आहे की ते जनतेपर्यंत पोहचविण्यात आपण कमी पडलो आहेत? याचे आत्मपरिक्षण करा असा सल्ला देखील त्यांनी दिला. सत्ताधा-यांच्या चुका जनतेच्या निदर्शनास आणून द्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांनी आपला ‘बायोडाटा’ पक्षाकडे द्यावा. येत्या आठ दिवसात प्रत्येक मतदारसंघात येऊन बैठका घेतल्या जातील. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील. त्यानंतरच उमेदवारी जाहीर केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.