Pimpri : ‘कोरोना’ रुग्ण संख्येनुसार पुणे, मुंबईसह आणखी सहा जिल्हे ‘रेड झोन’मध्ये!

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी (दि.11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. याच संवादात कोरोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. त्यानुसार 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या रेड (लाल) झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज म्हणजे भगव्या पट्टयात येतील आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन (हरित) पट्टयात समाविष्ट होतील. या भगव्या आणि हरित पट्टयांतील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात.केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील व कामगारांच्या सुरक्षेचा व्यवस्था करतील असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले.

रुग्ण संख्येनुसार वेगवेगळ्या झोनमध्ये विभागणी केलेल्या जिल्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

रेड झोन – मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबाद

ऑरेंज झोन – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, गोंदिया

ग्रीन झोन – धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली

रेड झोनमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांना कोणत्याही प्रमाणात दिलासा न देता तेथील नियम शिथील होणार नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यांना काही प्रमाणात संचारबंदी तून दिलासा मिळू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.